दापोलीतील शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण आवश्यक
By admin | Published: December 31, 2014 10:06 PM2014-12-31T22:06:36+5:302015-01-01T00:16:37+5:30
प्रसंगी बदल : दौऱ्यात कार्यकर्त्यांना सुनावले
चिपळूण : पक्ष संघटनेमध्ये काम करताना वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यापेक्षा त्यांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. पक्षात काम करताना व्यक्तीप्रेम असायला हरकत नाही. आपल्याला आदर्श वाटणाऱ्या नेतृत्त्वाबद्दल, व्यक्तीबद्दल प्रेम असू द्या. मात्र, असे व्यक्तीप्रेम पक्षाला मारक ठरता कामा नये, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मंडणगड दौऱ्यात बोलताना केले.
जिल्ह्याच्या संपर्क दौऱ्यावर असलेल्या जिल्हाप्रमुख कदम यांनी मंडणगड तालुका कार्यकारिणीची येथील शिवसेना कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, महिला आघाडीच्या वैशाली चोरगे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव पाहावा लागला. इथे जाती -पातीच्या राजकारणाचा फटका पक्षाला बसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, हे दुर्दैवी आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेत जाती-पातीला थारा दिला नाही. मात्र, ग्रामीण भागात विधानसभेत जाती-पातीत विषारी प्रचार झाला आणि या विषारी प्रचारातूनच पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे जाती - पातीचे राजकारण खेळले गेले तर दुसरीकडे व्यक्तीप्रेमामुळेही नुकसान झाले. व्यक्तीप्रेम असायला हरकत नाही. मात्र, त्या प्रेमामुळे संघटनेचे हित अडचणीत येता कामा नये. कार्यकर्त्यांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळताना आपण काही गमावत नाही ना? याची काळजी घ्यायला हवी, असेही जिल्हाप्रमुखांनी कार्यकर्त्यांना सांगितले. संघटनेत काम करताना शिवसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, जेणेकरुन भविष्यात पक्षाचे नुकसान होणार नाही. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी झालेल्या पराभावातून बोध घ्यावा व जोमाने कामाला लागावे, असा सल्ला कदम यांनी दिला. (प्रतिनिधी)