Ratnagiri: मंडणगडात खोदकामात सापडल्या पुरातन मूर्ती, टाकेश्वर मंदिराच्या इमारतीचे नूतनीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:52 PM2024-01-08T12:52:07+5:302024-01-08T12:52:45+5:30
मूर्ती संरक्षित करणार
मंडणगड : तालुक्यातील टाकवली येथील पांडवकालीन टाकेश्वर मंदिराच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मंदिर परिसरात खोदकाम करताना वीरगळ, सतीची शीळ व पांडवकालीन मंदिराचे भग्न अवशेषही सापडले आहेत. या अवशेषांमुळे मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाच्या भूतकाळातील खुणांचा अभ्यास करता येणार आहे.
टाकवली येथे भगवान शिवशंकरांचे पुरातन टाकेश्वर मंदिर आहे. यावर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने इमारतीच्या बाजूने जुने बांधकाम तसेच ठेवून आरसीसी बांधकाम करून मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामात कोकणातील मंदिराच्या परिसरात सापडणाऱ्या काळ्या दगडावर कोरलेल्या मूर्तीचे दोन नमुने सापडले आहेत. यात वीरांच्या स्मरणात काळ्या दगडावर कोरण्यात येणारी वीरगळ व युद्धानंतर सती जाणाऱ्या स्त्रियांच्या स्मरणातील सती शिळाही आढळली आहे.
टाकवली येथील शंकराचे मंदिर हे सर्वात जुने म्हणजे पांडवकालीन असल्याची ग्रामस्थांची मान्यता आहे. याशिवाय मूर्ती संदर्भातही गुराखी व गाईची आख्यायिका सर्वमान्य आहे. या संदर्भातील लोकमान्यता व उपलब्ध माहितीचे संदर्भ जोडता पांडवाच्या आधीही येथे शंकराची मूर्ती व मूर्तीच्या संरक्षणाकरिता मंदिर असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. दोन भिन्न कालखंडातील धागे एकमेकांशी जुळवत या संदर्भातील विश्वसनीय माहिती पुढे आणण्यासाठी या मूर्तीचे संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मूर्ती संरक्षित करणार
टाकेश्वर मंदिराच्या परिसरात खाेदकाम करताना सापडलेल्या मूर्ती मंदिरात ठेवून त्यांचे जतन करण्यात येणार आहे. हा प्राचीन पुरातन ठेवा येणाऱ्या पिढीस पाहता यावा, त्यातून आपली संस्कृती समजवून घ्यावी या उद्देशाने या मूर्ती संरक्षित करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.