... आणि भैरीबुवा शपथांमधून सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:41 PM2019-01-31T17:41:01+5:302019-01-31T17:42:14+5:30
रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपदी बसताना भैरीबुवासमोर मुदतीत राजीनामा देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी भैरी बुवासमोर आपला राजीनामा ठेवला होता.त्यानंतर शिवसेनेने सारवासारव करून राहुल पंडित यांचे कार्य चांगले असल्याचे सांगून तेच यापुढेही नगराध्यक्ष राहतील असे म्हटले होते. मात्र त्यांनी राजीनामा न देते रजेवर जावे असे ठरवण्यात आले. त्यामुळे भैरी बुवासमोर शपथ घेण्याचा मुद्दा पुढे आला होता.
भैरी देवस्थान हे रत्नागिरीतील सर्वाधिक मानाचे स्थान आहे. शिमग्यात येथील उत्सव पाहण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक हजेरी लावतात. सर्वसाधारपणे १९९५ पासून राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम राबवताना भैरी मंदिरात नारळ ठेवण्याची पद्धत सुरू केली. हे देवस्थान मानाचे असल्याने भैरीबुवासमोर कोणीही खोटे बोलत नाहीत, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच पद सोडण्याच्या, विशिष्ट ठिकाणी मतदान करण्याच्या शपथा भैरीबुवासमोर घेतल्या जातात.
केवळ राजकीयच नाही तर अराजकीय, कौटुंबिक शपथाही भैरीबुवासमोर घेतल्या जातात. गेल्या काही काळात त्याबाबतच्या चर्चा अधिक वाढल्या असल्याने आता देवस्थान विश्वस्त मंडळाने मंदिरात देवासमोर कोणालाही शपथ घेता येणार नाही, अशी सूचनाच एका फलकाद्वारे लावली आहे. या निर्णयाचे काहीजणांकडून स्वागत केले जात आहे, तर काहीजणांकडून त्याबाबत काहीशी नाराजीही व्यक्त केली जात आहे. भैरीबुवासमोर खोटेपणा केला जात नसल्याने तो धाक लोकांमध्ये राहण्यासाठी अशी मनाई केली जाऊ नये, अशी भावनाही काहीजण व्यक्त करत आहेत.