अन् अडीच वर्षांनी त्याला भेटले त्याचे घर
By admin | Published: September 11, 2016 11:02 PM2016-09-11T23:02:05+5:302016-09-11T23:30:49+5:30
माहेर संस्थेचा पुढाकार : तब्बल आठ महिने मिळाला आधार
शोभना कांबळे ल्ल रत्नागिरी
विविध सामाजिक संस्थांमुळे निराधार, पीडितांना आधार मिळू लागला आहे. मध्यप्रदेशातील मानसिक रूग्ण असलेल्या पुरूषोत्तम चरणसिंग जटाब याला निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेने तब्बल आठ महिने आधार दिलाच, शिवाय अथक प्रयत्नाने त्याच्या कुटुंबियांचीही माहिती मिळवली, त्यामुळे अडीच वर्षांनंतर तो त्याच्या घरी परतला आहे.
माहेर संस्था मुलींचे बालगृह तसेच निराधार स्त्री - पुरूषांना आधार देण्यासाठी वृद्धाश्रम चालवते. जानेवारी महिन्यात पुरूषोत्तम जटाब हा हातखंबा तिठ्यावर विमनस्क अवस्थेत संस्थेच्या कार्यकर्त्यांना सापडला. त्याला संस्थेत आणून त्यांनी त्याची मायेने विचारपूस केली, त्याला जेवण दिले. तो संस्थेच्या पुरूषांच्या वृद्धाश्रमात राहू लागला. पुरूषोत्तम अविवाहित असून, मानसिक रूग्ण असल्याचे संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्याला मनोरूग्णालयात आणले. त्यानंतर त्याच्यावर नियमित औषधोपचार सुरू झाले.
हळूहळू तो बरा होऊ लागला. त्याच्या बोलण्यातून त्याचे आई वडील, दोन भाऊ यांचा उल्लेख वारंवार येऊ लागला. यातून तो मध्यप्रदेशमधील बुलनशहर जिल्ह्यातील नैचोली येथील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्याच्या बोलण्यातून त्याचा एक भाऊ दिल्लीतील सादरा विभाग येथे टेलरच्या दुकानात काम करत असल्याचे समजले.
या माहितीवरून सुनील कांबळे यांनी नैचोली तसेच दिल्ली येथील त्याच्या भावांच्या पत्त्यावर संपर्क केला. महिनाभर काहीच उत्तर न आल्याने अखेर त्यांनी नैचोली येथील पोलिसांकडे दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी पोलीस ठाण्यात पुरूषोत्तम याची अडीच वर्षांपूर्वीच ‘मिसिंग’ म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. माहेर संस्थेत येण्यापूर्वी पुरूषोत्तम दोन वर्षे असाच भरकटत फिरत होता. अखेर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कांबळे यांनी त्याच्या दोन्ही भावांकडे संपर्क केला आणि काही दिवसांपूर्वी पुरूषोत्तम याचे दोन्ही भाऊ त्याला नेण्यासाठी माहेर संस्थेत दाखल झाले.
आपल्याला संस्थेचे पत्र मिळाले होते. परंतु इकडे येण्यासाठी पैसे नसल्याने आपण येऊ शकलो नाही, असे त्याच्या घरच्यांनी सांगितले. अखेर संस्थेकडून पुरूषोत्तम याला आनंदाने निरोप देण्यात आला.
अंधश्रद्धांचा अजूनही पगडा
मानसिक रूग्ण असलेल्या पुरूषोत्तमवर बाहेरची काहीतरी करणी असावी, या समजुतीने त्याच्या भावांनी आपली जमीन विकून अनेक भोंदुबाबांकडे त्याला नेले. पण, तो सुधारला नाहीच. उलट तो घरातून निघून आला. दोन वर्षे उलटून गेल्याने आपला भाऊ आता या जगात नाही, असे समजून त्याच्या कुटुंबियानी सारे धार्मिक सोपस्कारही करून टाकले होते.
पुरूषोत्तमला काही दिवसांपूर्वीच आई-वडीलांची खूप आठवण येऊ लागली होती. त्यामुळे आपले भाऊ आपल्याला न्यायला आलेले पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या आई -वडिलांना कधी भेटतोय, कधी घरी जातोय, असे त्याला झाले होते. हा सर्व प्रसंग पाहताना संस्थेतील सारे भारावले होते. संस्थेत आलेल्यांना त्यांचे जेव्हा घर मिळते, तो क्षण संस्थेसाठीही आनंदाचा ठरतो.
सुनील कांबळे, अधीक्षक, माहेर संस्था