अंगणवाडी सेविकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
By admin | Published: November 3, 2014 10:28 PM2014-11-03T22:28:05+5:302014-11-03T23:27:13+5:30
निवेदन सादर : जिल्हा परिषदेकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आश्वासन
रत्नागिरी : अंगणवाडी सेविका पदावर पाच वर्षे काम केल्यानंतर तिच्या जागी नवीन सेविका नियुक्त करून तिची मदतनीस पदावर नियुक्ती करण्यात आली. खेड तालुक्यातील चोरवणे येथील अन्यायग्रस्त अंगणवाडी सेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अर्धा दिवस पुन्हा उपोषण केले. यावेळी तिने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आरती अनंत शिंदे (रा. चोरवणे, ता, खेड) यांची चोरवणे - गावठाणवाडी येथे २००८ साली अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचे पती अपंग असल्याने बेरोजगार आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, नवीन शैक्षणिक अर्हतेनुसार अंगवाडी सेविका आठवी पास असणे गरजेचे असल्याचे कारण सांगत त्यांना मदतनीसपदी नेमणूक देण्यात आली. त्यानुसार त्यांचे वेतनही कमी झाले. मात्र, प्रत्यक्षात आरती शिंदे या अंगणवाडी सेविकेचे काम करत होत्या. दरम्यानच्या कालावधीत त्या आठवीच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाल्या. मात्र, त्यांची नियुक्ती मदतनीसपदीच राहिली. याबाबत त्यांनी अनेकदा दाद मागण्याचा प्रयत्न केला.
अखेर राष्ट्रीय मानवाधिकार एवं पुनरूद्धार संघटन (नारो) च्या खेड शाखेतर्फे न्यायालयात दाद मागण्यात आली. यावर न्यायालयाने आरती शिंदे या आठवी पास ही अर्हता पूर्ण करीत असल्याने त्यांची नियुक्ती अंगणवाडी सेविकापदी करण्याचे आदेश तातडीने दिले. मात्र, न्यायालयाचा आदेश एकात्मिक बालविकास अधिकारी, खेड यांनी धुडकावून लावला. शिंदे यांची नियुक्ती अमान्य करून २८ जानेवारी रोजी नवीन अंगणवाडी सेविकेसाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सन २००९ पासून शिंदे मदतनीस पदावर राहून अल्प पगारावर अंगणवाडी सेविकेचे काम करत होत्या. त्यामुळे याप्रकरणी शिंदे यांना २००९ सालापासून अंगणवाडी सेविकेच्या वेतनातील नुकसान भरपाई मिळावी, तसेच त्यांना पुन्हा अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती मिळावी, यासाठी आरती शिंदे, त्यांचे कुटुंबीय तसेच कॅ. अनंत निकम यांनी आज दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
हे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी स्वीकारले. या निवेदनात त्यांनी २००८पासून आतापर्यंतचे वेतन मिळावे, तसेच अंगणवाडी सेविका भरतीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, खेड यांनी काढलेली जाहिरात नोटीस रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषदेकडे कार्यवाहीकरिता हे निवेदन लगेचच पाठविले जाईल, असे निगुडकर यांनी सांगितले.
या उपाषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास पुन्हा तीव्र उपोषण करण्यात येईल, असे कॅ. निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाच वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेल्या सेविकेला हटवून केली मदतनीस पदावर नियुक्ती.
उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकेचे पती अपंग.
आरती शिंदे यांचे कुटुंबीयही उपोषणात सहभागी.
उपोषणाची दखल न घेतल्यास प्रशासनाविरूध्द पुन्हा उपोषण करण्याचा इशारा.
अर्धा दिवस केले आंदोलन.
अंगणवाडी सेविका पदावर पाच वर्षे काम केल्यानंतर मदतनीस पदावर नियुक्ती केल्याने अंगणवाडी सेविकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (सोमवार) अर्धा दिवस पुन्हा उपोषण केले.