अंगणवाडी सेविकांनी केले माेबाईल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:00+5:302021-08-24T04:36:00+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल वापरण्यास निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि नवीन अपलोड केलेले पोषण ॲप हे ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल वापरण्यास निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि नवीन अपलोड केलेले पोषण ॲप हे इंग्रजीमधून असल्याने सेविकांना कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत करण्याचे आंदोलन पुकारले असून, त्यांनी आपल्याकडील मोबाईल परत केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा कृती समितीच्या अध्यक्ष नफीसा नाखवा, संजोक्ती शिंदे यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी नवीन मोबाईल तसेच ॲप मराठीमधून द्या, अशी मागणी केली. काम सुलभ आणि जलद व्हावे यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविकांना २०१९ साली मोबाईल दिले होते. तसेच सीमकार्डसोबत रिचार्ज खर्चही शासनाकडून दिला जात होता. मोबाईलमध्ये पोषण आहार, मुलांची वजने, गरोदर माता नोंदणी, स्तनदा माता नोंदणी, लसीकरण, सर्वेक्षण याबाबतची सर्व माहिती भरली जात होती. त्यामुळे कामही सोपे झाले होते. मात्र, काही दिवसांतच मोबाईलला तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. सीएएसचा डाटा पुढे सेव्ह होणे थांबणे, मोबाईल बंद पडल्यामुळे सेविकांना स्वत:चे ३ ते ४ हजार खर्च करावे लागले तसेच ॲप इंग्रजीमधून असल्याने माहिती भरण्यासाठी दुसऱ्यांचे पाय धरावे लागतात. नवीन ॲपमध्ये हे मराठीतून देण्यात यावे व ते ऑफलाईन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांनी आपल्या ताब्यातील सर्व मोबाईल शासनाला परत केले.