देवदूत धावले... गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:47 PM2022-05-13T21:47:47+5:302022-05-13T21:53:07+5:30
विकास जाधव (४६), संजना जाधव (४०), अंचल करंजे (२१, सर्व राहणार इचलकरंजी, ता. हातकणंगले) हे देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते.
रत्नागिरी/गणपतीपुळे : येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत खोल पाण्यात ओढले गेले. पाण्यात बुडत असतानाच मोरया वॉटर स्पोर्टसच्या सदस्यांनी स्पीड बोटीच्या सहाय्याने या तिघांना सुखरुपपणे पाण्याबाहेर काढले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. हे तिघेही इचलकरंजी येथील राहणारे आहेत.
विकास जाधव (४६), संजना जाधव (४०), अंचल करंजे (२१, सर्व राहणार इचलकरंजी, ता. हातकणंगले) हे देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही लाटेसोबत खोल पाण्यात ओढले गेले. पाण्यात बुडत असताना समुद्रकिनारी असणाऱ्या मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या सदस्यांनी स्पीड बोटच्या मदतीने त्यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढून समुद्र किनारी आणले.
या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार मधुकर सलगर यांनी गणपतीपुळे समुद्र किनारी जाऊन बुडणाऱ्या पर्यटकांची चौकशी करून त्यांना मदत केली. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनीही मोरया वॉटर स्पोर्टसच्या बोटचालकांना सहकार्य दर्शविले. सध्या गणपतीपुळे येथे उन्हाळी हंगामात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांनी समुद्रस्नानाचा अतिउत्साह व अतिरेक न करता समुद्राच्या कमी पाण्यात आंघोळीसाठी उतरावे, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलिसांनी केले आहे. सध्या समुद्राच्या पाण्याचा प्रवाहही बदलला असून, पाण्याला मोठा करंट असल्याने समुद्राचा धोका वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राच्या धोक्याची माहिती घेऊनच समुद्रात आंघोळीसाठी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.