खेडच्या संतप्त व्यापाऱ्यांचा नगर परिषदेच्या सभागृहात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:24+5:302021-04-07T04:32:24+5:30

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील व्यापारी खेड नगरपरिषदेच्या सभागृहात एकत्र आले हाेते. त्यांनी दुकाने बंद करण्यास ठाम विराेध दर्शविला. लाेकमत ...

The angry merchants of Khed sit in the Municipal Council hall | खेडच्या संतप्त व्यापाऱ्यांचा नगर परिषदेच्या सभागृहात ठिय्या

खेडच्या संतप्त व्यापाऱ्यांचा नगर परिषदेच्या सभागृहात ठिय्या

Next

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील व्यापारी खेड नगरपरिषदेच्या सभागृहात एकत्र आले हाेते. त्यांनी दुकाने बंद करण्यास ठाम विराेध दर्शविला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : राज्य शासनाच्या आदेशानंतर खेडमधील स्थानिक प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील व्यावसायिक आणखीनच संतप्त झाले. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात एकच गोंधळ घालत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी सुमारे दोनशेहून अधिक व्यापारी उपस्थित होते. या व्यापाऱ्यांनी प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना घेराव घालत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

यावेळी प्रांताधिकारी सोनोने यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत आम्ही केवळ शासनाच्या आदेशाचे पालन करत आहोत, असे सांगितले. मात्र, व्यापारी विराेधावर ठामच हाेते. हॉटेल व्यावसायिकांनी सकाळी तयार केलेल्या मालाचे करायचे काय, हा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. या प्रश्नावर प्रशासकीय अधिकारी मात्र निरुत्तर झाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे ही काळाची गरज असली तरी ज्या पद्धतीने खेडमध्ये लॉकडाऊन लादला जात आहे ते आम्हाला मान्य नाही, कोरोनाच्या नावाखाली गेले अनेक महिने बंद असलेला व्यवसाय आता कुठे सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा व्यवसाय बंद करणे आम्हाला परवडणारे नसल्याने आम्ही दुकाने बंद ठेवणार नाही, असा पवित्रा व्यावसायिकांनी घेतला. व्यापारी आणि अधिकारी वर्ग यांची समजूत काढत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सुवर्णमध्य काढत सायंकाळी ५ वाजता व्यापारी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त झालेले व्यापारी काहीअंशी शांत झाले.

Web Title: The angry merchants of Khed sit in the Municipal Council hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.