अनिल कानविंदे स्मृती खुल्या बुध्दिबळ स्पर्धा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:50+5:302021-09-25T04:33:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी चेस ॲकॅडमीतर्फे अनिल कानविंदे स्मृती खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी चेस ॲकॅडमीतर्फे अनिल कानविंदे स्मृती खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २५ रोजी शहरातील ओम साई मित्रमंडळ हॉल येथे करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने आणि प्रशासकीय नियमांचे पालन करून ७० खेळाडूंसाठी ‘ओव्हर द बोर्ड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी २२ बक्षिसे ठेवण्यात आली असून, विजेत्यांना एकूण रोख रक्कम १५ हजार रुपये आणि पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी नावनोंदणीसाठी विवेक सोहनी, चैतन्य भिडे व मंगेश मोडक यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ७० खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून, अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन चेस ॲकॅडमीच्या विवेक सोहनी यांनी केले आहे.
स्पर्धेतील खुल्या गटासाठी ५०० रूपयांपासून ३,५०० रूपयांपर्यंत दहा बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंसाठी रोख ५०० रूपये, ३०० व २०० रूपयांची तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी रोख ५०० रूपये, ३०० रूपये व २०० रूपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धा कालावधीत मास्कचा वापर बंधनकारक असून, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.