अनिल परब यांचे रिसाॅर्ट लवकरच पाडणार, १४ नोव्हेंबर रोजी उघडणार निविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 06:28 AM2022-10-23T06:28:24+5:302022-10-23T06:28:44+5:30
दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता.
रत्नागिरी : माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापाेली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने जाहिरात दिली असून, त्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. याविराेधात त्यांनी न्यायालयीन लढाई लढली हाेती. मात्र, हे रिसाॅर्ट आपले नाही, असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे.
सोमय्या यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे. चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रात साई रिसॉर्ट पाडण्यासाठी जाहिरात दिली आहे. कंत्राटदारांना १० नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्याचे आवाहन केले आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.