रत्नागिरीत प्राणी गणनेत आढळला ९९ प्राण्यांचा मुक्तसंचार
By संदीप बांद्रे | Published: June 17, 2023 06:43 PM2023-06-17T18:43:20+5:302023-06-17T18:44:34+5:30
पंधरा ठिकाणी १६ प्रकारचे प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आल्याचे आढळले.
चिपळूण : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन विभागाकडून जिल्ह्यात पंधरा ठिकाणी प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत ९९ प्राणी मुक्त संचार करताना आढळले. त्यात माकड, गवा आणि रानडुकरांची संख्या जास्त आहे. प्राणी गणनेत एकमेव कोळकेवाडी धरणावर बिबट्या आढळला.
बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री म्हणजे ५ आणि ६ मे महिन्यात प्राणी गणना करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला होता. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. अशा वेळी जिथे पाणी, तिथे प्राणी आवर्जून जातात. बुद्धपौर्णिमा ही सर्वाधिक प्रकाश असलेली रात्र असते. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी पाणवठ्यावर येतील, या हिशोबाने वन कर्मचारी सायंकाळपासून पाणवठ्यावर मुक्काम ठोकून होते. पंधरा ठिकाणी १६ प्रकारचे प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आल्याचे आढळले.
या ठिकाणी झाले प्राण्यांचे निरीक्षण
नांदगाव - आंबतखोल हडकणी धरण
रानवी - तळवली धरण,
अडूर - पिंपर धरण
आबलोली - कोतळूक धरणाचे पाणी
कोळकेवाडी - कोळकेवाडी धरण
देव्हारे - मौजे तुळशी धरण
बांधतिवरे - शिवाजी नगर
तळे - घेरारसाळगड
राजापूर - कावतकर
आरवली - पाझर तलाव
फुणगुरा - बागी धरण
कोर्ले - खोरनिनको धरण
लांजा - कुर्णे पाणवठा
रत्नागिरी - कशेळी वळवणे
प्राणी, पक्षी आढळलेली संख्या
रानडुक्कर २५, भेकर ४, कोल्हे ७, सांबर २, उदमांजर ४, गवा १९, बिबट १, ससा ५, बगळा १, खंड्यापक्षी १, मोर १, शाळींदर २, कोळशिंदे ०४, मगर २, कोंडचोर ०१, माकड २०, एकूण ९९