अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी उघड; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:36 AM2024-11-19T11:36:32+5:302024-11-19T11:36:55+5:30
गुहागर पोलिसांची मोठी कारवाई; नऊ जण ताब्यात
गुहागर (जि. रत्नागिरी) : तालुक्यातील अंजनवेल जेटीवरून होणाऱ्या डिझेल तस्करीचा पर्दाफाश गुहागर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी रविवारी मध्यरात्री डिझेलची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेतले असून, २५ हजार लिटर डिझेलसह २ कोटी ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुहागरमधील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
अंजनवेल येथे रविवारी रात्री गस्तीदरम्यान समुद्रामार्गे डिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंजनवेल जेटी किनारी मध्यरात्री १:०० ते ३:०० वाजण्याच्या दरम्यान एक मच्छीमारी बोट पोलिसांना दिसली. पोलिसांनी या बाेटीची तपासणी केली असता डिझेलचा साठा सापडला.
याबाबत चौकशी केल्यानंतर हा साठा अवैध असल्याचे समोर आले. या बोटीवर जीवनावश्यक वस्तू, डिझेल टँकरमध्ये पंप व पाइप सापडले. या डिझेल तस्करीसाठी वापरण्यात आलेली मच्छीमारी बोट, बोटीवरील पंप व पाइप, टँकर (एमएच ४६ बीएम ८४५७), कार (एमएच ४६ बीके २५६८) तसेच २५ हजार लिटर डिझेल, नऊ मोबाइल फोन गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी बोटीवरील नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.