ऐन थंडीत झाले कोकण गरमा-गरम-वातावरण दमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:02 AM2018-11-27T11:02:33+5:302018-11-27T11:04:35+5:30
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात बहुतांश भागात ढगाळ स्थिती असल्याने राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली असली, तरी कोकणात ...
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात बहुतांश भागात ढगाळ स्थिती असल्याने राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली असली, तरी कोकणात मात्र अद्यापही उष्मा जाणवत आहे. मुंबई आणि कोकण विभागात मात्र किमान तापमान अद्यापही २१ ते २४ अंशांच्या आसपास असल्याने वातावरण दमट आहे. रत्नागिरी येथे रविवारी उच्चांकी कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे.
उत्तरेकडून थंड वाºयांचा प्रवाह दक्षिणेकडे वाहत असल्याने मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र किमान तापमानात घट झाली आहे. काही भागांमध्ये सकाळी धुके पडू लागले आहे. पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार असल्याने गारठा वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दुसºया आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. मात्र, त्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्रातील कमीदाबाचा पट्टा यामुळे मागील आठवड्यात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. याच कालावधीत सर्वत्र ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान आहे. त्याचप्रमाणे उत्तरेकडून थंड वाºयांचे प्रवाह येत आहेत. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा घट सुरू झाल्याने संध्याकाळपासूनच गारव्याचा अनुभव मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान आणि कमाल अशा दोन्ही तापमानात घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे येथे कमाल तापमान १४.९ अंश होते. महाबळेश्वर येथे १६ अंशांच्या आसपास तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक येथे नीच्चांकी १३.६ तापमान नोंदवले गेले. मराठवाड्यात बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा १३ ते १६ अंशांवर आहे.