जयंती कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:30+5:302021-04-13T04:30:30+5:30
घरावर ध्वज लावावा रत्नागिरी : गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत दिनांक १३ ते २७ एप्रिल अखेर हिंदूू नागरिकांनी आपल्या घरावर ...
घरावर ध्वज लावावा
रत्नागिरी : गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत दिनांक १३ ते २७ एप्रिल अखेर हिंदूू नागरिकांनी आपल्या घरावर भगवा ध्वज लावावा व आपल्या संघटन शक्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. चैत्र प्रतिपदा निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री दीपक जोशी यांनी आवाहन केले आहे.
बंधाऱ्याला प्रारंभ
दापोली : उटंबर येथे समुद्र धूपप्रतिबंधक संरक्षक बंधाऱ्याचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. उटंबर येथील ग्रामस्थांची कित्येक वर्षांची प्रलंबित असलेली समुद्र धूपप्रतिबंधक संरक्षक बंधाऱ्याची रखडलेली मागणी मार्गी लागली आहे.
खानविलकर यांची निवड
राजापूर : येथील युवकांकडून एनआर प्रतिष्ठान राजापूरची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी राजा खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानतर्फे राजापूर तालुक्यात, तसेच अन्य ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उपाध्यक्षपदी संदेश आंबेकर व अमर वारिशे यांची निवड करण्यात आली आहे.
बीएसएनएलचा बोजवारा
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख व लगतच्या परिसरात भारत संचार निगमची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. याबाबत वेळोवेळी ग्राहकांकडून तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रविवारी अचानक बिघाड झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
कोरोना चाचणी
गुहागर : तालुक्यातील आबलोली ग्रामकृतिदल व पोलीस प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार, आबलोली बाजारपेठेतील ज्या व्यापाऱ्यांजवळ कोरोना चाचणी केल्याचा व रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल असेल, त्यांनीच आपला व्यवसाय किंवा दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
रस्त्याची दुरवस्था
राजापूर : तालुक्यातील अणुऊर्जा प्रकल्प बाधित क्षेत्रात येणाऱ्या माडबन गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. १० हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प माडबन येथे होत असून, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जागा देऊ केल्या आहेत.
यात्रौत्सव रद्द
रत्नागिरी : तालुक्यातील भडे गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. शासनाच्या कोरोना नियमावलीचे पालन करुन केवळ धार्मिक कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
माने यांचा सत्कार
देवरुख : कोंडगाव ग्रामपंचायत येथे व्यापारी मंडळातर्फे सभापती जया माने यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन माने यांचा सत्कार केला. यावेळी कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, उपसरपंच प्रवीण जोयशी, तसेच व्यापारी उपस्थित होते.
रस्त्याचे काम मार्गी
पावस : रेवस रेड्डी मार्गावरील भाट्ये पावस, पूर्णगड, गावखडी रस्त्याचे विशेष दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. तीर्थक्षेत्र या मार्गावर असल्याने पर्यटक व स्वामीभक्तांची गैरसोय होत होती. मात्र, रस्त्याचे काम मार्गी लागल्याने वाहन चालक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.