जलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर, दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:55 PM2018-09-13T15:55:48+5:302018-09-13T15:58:51+5:30
भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून ह्यजलयुक्त शिवार योजनाह्ण एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून जलयुक्त शिवार योजना एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७३७ कामांची पूर्तता करण्यात येणार असून, त्यासाठी १७ कोटी १७ लाख ६ हजार रूपयांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांना प्रारंभ होणार आहे.
या योजनेतील चौथ्या टप्प्यांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली, मालगुंड, निवेंडी, लांजा तालुक्यातील कोंडगे, कोंडगाव, वाकेड, राजापूर तालुक्यातील होळी, मंदरूळ, धामणवणे, भोम, चिपळूण तालुक्यातील गोंधळे (माजरेकोंड), पोसरे, टेरव, मासरंग, निवदे, निवे (बु), संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे, विघ्रवली, माभळे, भडकंबा, गुहागर तालुक्यातील चिखली, उमराट, दापोली तालुक्यातील हर्णै, कवडोळी, गावराई, पोफळवणे या गावांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील चिंचवळी, किंजळेतर्फ नातू, वाडीजैतापूर, सवेणी, मंडणगड तालुक्यातील अडखळवण, घोसाळे या गावांची निवड करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवारच्या जिल्ह्यातील कामांची पूर्तता करण्यासाठी कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद कृषी विभाग, जलसंधारण या विभागांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे ४९३ कामांसाठी ३ कोटी ७६ लाख ६३ हजारांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम असून, त्यासाठी एक लाख २१ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे १७० कामांची जबाबदारी असून, त्यासाठी एक कोटी ८६ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील ६१ कामांसाठी ३८ लाख ६० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. जलसंधारण विभागाकडे १२ कामांची जबाबदारी असून, त्यासाठी २ कोटी १४ लाख २ हजार रूपयांची निधी अपेक्षित आहे.
विविध तालुक्यांसाठी आवश्यक निधी
रत्नागिरी तालुक्यातील ११९ कामांसाठी १ कोटी २ लाख ३३ हजार रूपये निधी आवश्यक आहे. लांजा तालुक्यात ४६ कामे निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी २ कोटी २६ लाख ३८ हजारांचा निधी लागणार आहे. राजापूर तालुक्यात ३९ कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता एक कोटी ७ लाख ४४ हजारांचा निधी लागणार आहे.
गुहागरात ७४ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी ६२ लाख ९९ हजार, संगमेश्वरातील ७५ कामांसाठी १ कोटी ८ लाख ५९ हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. खेड तालुक्याला १२३ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी १५ लाख ३८ हजार रुपये, दापोलीतील ११४ कामांसाठी ३ कोटी ९७ लाख ८८ हजार, मंडणगडातील ५१ कामांंसाठी एक कोटी ९ लाख ३० हजारांचा निधी अपेक्षित आहे.