चिपळूण अन् खेड शहराच्या स्वच्छतेसाठी एकनाथ शिंदेंकडून तात्काळ 3 कोटींच्या निधीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:12 PM2021-07-27T23:12:34+5:302021-07-27T23:14:34+5:30
गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे.
रत्नागिरी - चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तसेच, खेड शहराच्या दौऱ्यात पूर ओसरल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन चिखल, कचऱा स्वच्छतेसाठी खेड नगर परिषदेला १ कोटींचा निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली. म्हणजेच एकूण दोन्ही शहराच्या स्वच्छतेसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा शिंदे यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचेदेखील शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच खेड शहरालाही 1 कोटीचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.
#रत्नागिरी जिल्ह्यातील #खेड शहराच्या दौऱ्यादरम्यान पूर ओसरल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन चिखल, कचऱा स्वच्छतेसाठी खेड नगर परिषदेला १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2021
🔸 कुटुंबनिहाय मदतीऐवजी रेशन कार्ड निहाय कुटूंब ग्राह्य धरून मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश. pic.twitter.com/6ib2RgE3v1
शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळदेखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं. चिपळूण शहराला नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
#रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त #चिपळूण शहर आणि बाजारपेठेची पाहणी केली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2021
🔸चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी रु.२ कोटी च्या निधीची घोषणा.
🔸चिपळूणला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ५ मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती तर ठाणे, नवी मुंबईतील स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी pic.twitter.com/vklHf8OV7t