गोविंद गडाच्या रस्त्यावर अज्ञाताने काढले चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:18 PM2019-12-07T16:18:40+5:302019-12-07T16:19:42+5:30
गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंद गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात अज्ञाताने चार ठिकाणी शुक्रवारी रात्री जेसीबीने चर काढले आहेत. याप्रकरणाने येथे खळबळ निर्माण झाली असून श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानसह गोवळकोट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर चर काढल्याने नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही या घटनेची गंभीरपणे दखल घेतली आहे.
चिपळूण : गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंद गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात अज्ञाताने चार ठिकाणी शुक्रवारी रात्री जेसीबीने चर काढले आहेत. याप्रकरणाने येथे खळबळ निर्माण झाली असून श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानसह गोवळकोट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर चर काढल्याने नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनीही या घटनेची गंभीरपणे दखल घेतली आहे.
येथील नगर परिषदेने गोविंद गडावर पाणी योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प १९९२ मध्ये उभारला असून त्याठिकाणी जाण्यासाठी गोवळकोट ताराबौद्धवाडीच्या बाजूने नगर परिषदेने रस्ता केला आहे. या रस्त्यावर अनेकदा नगर परिषदेने निधीही खर्च केला आहे. त्यानंतर आता हाच रस्ता साठवण टाकीपासून गोविंद गडापर्यंत जाण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून नव्याने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र काहींनी या रस्त्याच्या जागेवर हक्क दाखवण्यास सुरुवात केली असून त्यातूनच हा चर खोदाईचा प्रकार घडला असल्याची माहिती पुढे आली आहे.
शुक्रवारी रात्री कोणाच्याही न कळत गडावरील रस्त्यावर चर काढण्यात आले. हा प्रकार शनिवारी सकाळी लक्षात येताच श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, सचिव उदय जुवळे, ग्लोबल टुरिझम चिपळूणचे अध्यक्ष राम रेडिज, महेंद्र कासेकर, राजे प्रतिष्ठानचे विशाल राऊत, शाखा प्रमुख मारुती मेंडे, बबन कासेकर, अभय जुवळे, दत्ताराम हेलवंडे, राम शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, स्थानिक नगरसेविका सुषमा कासेकर, नगरसेवक परिमल भोसले, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, नगर अभियंता परेश पवार आदींनी पाहणी करून याविषयी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.