आणखी १४ रुग्णांची भर
By admin | Published: March 19, 2015 09:33 PM2015-03-19T21:33:00+5:302015-03-19T23:52:53+5:30
बोरज अतिसार : आरोग्य विभागाची तीन पथके तैनात
खेड : तालुक्यातील बोरज गावातील ग्रामस्थांना दुषित पाण्यामुळे उलटी जुलाबाचा त्रास झाल्याने कळंबणी रूग्णालयात उपचार घेत असलेले आणि उपचार घेऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या ६३वर पोहोचली आहे. याबाबतची कळंबणी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत यांनी दिली आहे. यामध्ये लोटे येथील रूग्णालयामध्ये दाखल केलेल्या दोन रूग्णांचा समावेश
आहे़ मंगळवारी ४० रूग्णांपैकी ६ जणांना घरी पाठवण्यात आले होते.़ सांयकाळी पुन्हा १० जणांना दाखल करण्यात आले होते़ यामुळे रूग्णालयात ४४ रूग्ण उपचार घेत होते. बुधवारी मात्र कळंबणी रूग्णलयातील ११ जणांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना सकाळी बोरज येथील त्यांच्या घरी पाठवण्यात आले, तर बोरज गावातील आणखी १४ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यातील ८ जणांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर ६ जणांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कळंबणी रूग्णालयात बुधवारी दाखल असलेल्या रूग्णांची संख्या ४१ झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ विनोद अभिवंत यांनी दिली आहे बोरज गावातील या तीन वाड्यामध्ये २३६ घरे आहेत. या सर्वच घरांमध्ये अतिसाराची लागण झाली आहे़ येथे ३ रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. रूग्णवाहिकेच्या या तातडीच्या सेवेमुळे रूग्णांना सत्वर आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने ही साथ ओटाक्यात आणणे शक्य झाले आहे.
याशिवाय प्रत्येकाच्या घरामध्ये १०० मिली मेडिक्लोअर बाटली देण्यात आली आहे. याद्वारे घरातील पाणीदेखील शुध्द करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात ३ पथकाद्वारे तेथील रूग्णांना तातडीने सेवा देण्यात येत असून तालुका आरोग्य अधिकारी आणि दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आणखी २४ कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. सर्वांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. विनोद अभिवंत यांनी दिली आहे. दरम्यान गावातील अतिसाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यशही येत असले, तरी नव्याने रूग्ण रूग्णालयात दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
आंदोलनाचा इशारा
अतिसार प्रकरणी कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची हेळसांड झाल्याबाबत खेड तालुका आरपीआय युवक आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोग्य केंद्राला आरपीआय युवक आघाडीने भेट दिली असता, तेथील असुविधांबाबत आघाडीने चिंता व्यक्त केली. आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव होता. पीडितांची काळजी न घेतल्यास आरपीआय आंदेलन छेडेल, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़