रत्नागिरीत आणखी एक महाविद्यालय
By admin | Published: August 8, 2016 10:29 PM2016-08-08T22:29:12+5:302016-08-08T23:41:24+5:30
भारत शिक्षण मंडळ : अच्युतराव पटवर्धन वरिष्ठ महाविद्यालय होणार सुरु
रत्नागिरी : शहरातील भारत शिक्षण मंडळाला ११४ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेतर्फे गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सातत्याने मागणी करण्यात येत असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाला महाराष्ट्र शासन उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंडळाकडून परवानगी मिळाली आहे. १८ आॅगस्टपासून संस्थेचे कै. अच्युतराव पटवर्धन वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेने लोकसहभागातून १ कोटी २० लाखांची अद्ययावत इमारत उभारली आहे. महाविद्यालयाला बेंचेस व दोन शौचालये रोटरी क्लबतर्फे बांधून देण्यात आली आहेत. कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर वरिष्ठ महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा सुरू करण्यात येणार असून, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक शाखेसाठी १२० विद्यार्थी संख्या आहे. महाविद्यालयासाठी सुसज्ज, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे. सकाळी ७.३० ते १२पर्यंत महाविद्यालयाचे कामकाज चालणार असल्याची माहिती संस्थेचे माजी कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर यांनी दिली. संस्थेतर्फे विद्यार्थिनींना विशेष शैक्षणिक सवलत देण्यात येणार आहे. शासनाकडून मान्यतेचा आदेश ५ आॅगस्ट रोजी काढण्यात आला आहे.वरिष्ठ महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. संस्थेला उशिरा मान्यता मिळाल्याने १८पासून वरिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक काम सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जादा तासिका घेऊन शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येणार असल्याचे हातखंबकर यांनी सांगितले.यावेळी डॉ. चंद्रशेखर केळकर, बाबा शिंदे, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे, पर्यवेक्षक मिलिंद कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)