चिपळुणात आणखी एक कोरोना तपासणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:14+5:302021-05-13T04:32:14+5:30
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व आगामी तिसरी लाट लक्षात घेता ...
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व आगामी तिसरी लाट लक्षात घेता नगर परिषदेने शहरातील महर्षी कर्वे भाजी मंडई इमारतीत आणखी एक कोरोना तपासणी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात अँटिजन व आरटीपीसीआर या दोन्ही तपासण्या करण्याची सुविधा आहे.
सध्या तालुक्यात १३०० हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत २३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील रुग्णांचा तितकाच मोठा समावेश आहे. त्यामुळे नगर परिषदेने भविष्यातील धोका ओळखून काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना तपासणी केंद्र नव्याने सुरू केले आहे.
याविषयी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन महर्षी कर्वे भाजी मंडई इमारतीतील गाळा क्रमांक ३१ व ३२ मध्ये हे केंद्र सुरू केले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे केंद्र सुरू राहणार असून, कालांतराने या वेळेत बदल करणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी कळवले आहे.