प्रकल्पविरोधी अशांत वातावरण
By admin | Published: June 21, 2017 01:08 AM2017-06-21T01:08:22+5:302017-06-21T01:08:22+5:30
राजापूर तालुका : कुंभवडे-नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पासाठी अधिसूचना जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : स्थानिक जनतेचा मोठा विरोध असतानादेखील तो न जुमानता शासनाने जगातील सर्वांत मोठा असा केंद्र व राज्य सरकारचा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडीत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अधिसूचनाही शासनाने जाहीर केल्याने राजापूर तालुक्यात आणखी एका प्रकल्पावरून चांगलाच संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी सुमारे दहा हजार मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर परिसरात मार्गी लागत असताना आता रिफायनरी प्रकल्प येणार हे नक्की झाल्याने भविष्यात हा तालुका प्रकल्पविरोधी अशांत वातावरणाचा राहणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
केंद्र सरकारची ४९ टक्के, तर राज्य सरकारची ५१ टक्के भागिदारी असलेला सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा पेट्रोकेमिकलचा रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पंधरा हजार एकर जागेची आवश्यकता आहे. यापूर्वी रत्नागिरी, गुहागरसह जिल्ह्यात काही ठिकाणी जागांची चाचपणी करण्यात आली होती. त्यामध्ये राजापूर तालुक्याचाही सामावेश होता. मात्र, नियोजित प्रकल्पाला योग्य ठरेल, अशी प्रशस्त जागा राजापूर तालुक्यात उपलब्ध झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब होऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने त्याची अधिसूचना जारी केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १३ हजार ८०० एकर क्षेत्राचे सर्व्हेक्षण झाले असून, त्यामध्ये ५१ टक्के क्षेत्र पोटखराबा, तर २० टक्के क्षेत्र कातळ असल्याची माहिती शासनाने प्रसिध्द केल्यानंतर चांगलाच वादंग माजला आहे.
शासनाने असा कुठलाच सर्व्हे केलेला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती आहेत. या प्रकल्पामुळे त्या नष्ट होतील व आमचे आतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला आहे. केंद्र सरकारच्या इंडियन आॅईल, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम व राज्य सरकार यांच्या भागिदारीतून प्रकल्प असेल व प्रतिवर्षाला ६० दशलक्ष टन रिफायनरी केली जाईल, अशी माहिती आहे.
त्यामध्ये निवासी संकुलासाठी उन्हाळे, जुवाटी ते गिर्येपर्यंत जागा निश्चित केली जाईल, अशीही माहिती पुढे आली होती. सुमारे १५० एकर जागेत टाऊनशिप निश्चित करण्यात आली असल्याचे कळते. शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाला राजापूर तालुक्यात मान्यता मिळाली आहे. त्याची अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. त्याचे तीव्र पडसाद तालुक्याच्या राजकारणात उमटले आहेत. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवगळता शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने प्रकल्पाविरुध्द रणशिंग फुंकले आहे.
त्यामुळे रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागील काही वर्षे जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पावरुन जोरदार रणकंदन पाहायला मिळाले. आतादेखील अधूनमधून अणुऊर्जा प्रकल्पावरुन आंदोलने होत आहेत. त्यामुळे मागील दशकभर राजापूर तालुका हा अशांत होता. आता रिफायनरी प्रकल्पावरुन तालुक्यातील शांतता अधिकच बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. परिणामी कायदा - सुव्यवस्थेवर मोठा ताण पडणार हे निश्चित आहे.