जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची कशेडी घाटात ॲन्टिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:05+5:302021-04-17T04:31:05+5:30
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात प्रवासी वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली असून, प्रवाशांची ...
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात प्रवासी वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली असून, प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे कारणाशिवाय जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना चाचणी करूनच प्रवेश करता येणार आहे.
जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ठाेस कारणाशिवाय काेणीही जिल्ह्यात प्रवेश करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी चाकरमान्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांतील प्रवाशांची कशेडी घाटातील नाक्यात ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यास सुरुवात केली.
तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजन शेळके, आरोग्यसेवक अजित तटकरे, आरोग्यसेवक नीलेश लाड, आरोग्य साहाय्यक एन. टी. जाडकर, आरोग्यसेविका पी. एस. भोजे, सामुदायिक आरोग्याधिकारी के. एल. भिलवडे यांचे पथक येथे कार्यरत हाेते.
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कारणासाठी प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात येताना अॅन्टीजेन चाचणी करूनच प्रवेश दिला जात आहे. राज्य सरकारने पूर्व सूचना देऊन सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांची संख्या कमी झाली आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता या वर्षी मुंबई व पुणे येथील चाकरमानी मंगळवारी संध्याकाळपर्यंत आपापल्या गावी पोहोचले आहेत. कशेडी घाटासह शहरातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्या नोकरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे.
..........................................
khed-photo161 रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड तालुक्यातील कशेडी घाटात प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे.