दिवसाच होतेय ॲन्टिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:41+5:302021-05-01T04:30:41+5:30
अस्वच्छतेकडे दुर्लक्ष रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ कारखाने आहेत. अनेक बर्फ कारखाने खाण्याचा बर्फ बनविण्यास योग्य नसून अस्वच्छ ...
अस्वच्छतेकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ कारखाने आहेत. अनेक बर्फ कारखाने खाण्याचा बर्फ बनविण्यास योग्य नसून अस्वच्छ आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तरीही तेथील बर्फ लोकांच्या माथी मारले जात आहेत.
रुग्णवाहिका देण्याची मागणी
चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सुमारे २९ गावे येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राची २ वर्षापूर्वी बांधण्यात आलेली अडीच कोटी रुपयांची इमारत आकर्षक बनली आहे. कर्मचारी कमी असूनही या केंद्रात मिळत असलेल्या आरोग्य सेवेमुळे येथे उपचारासाठी रुग्णांची नियमितपणे गर्दी असते.
शेतीच्या मशागतीची कामे जोरात
आरवली : माखजन भागात भातशेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. शेतात भाजवळीमध्ये शेतकरी गुंतले आहेत. सोबत लॉकडाऊनच्या अगोदर आलेले चाकरमानी शेतकरीही आता मशागतीच्या कामात स्थानिकांना मदत करीत आहेत.
रस्त्यावर अस्वच्छता धोक्याची
रत्नागिरी : शहरालगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम कृती दले स्थापन करण्यात आली आहेत. त्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोविड सेंटरला विरोध
लांजा : शहरातील पोलीस वसाहतीजवळ असलेल्या पोलिसांच्या संकल्पसिध्दी सभागृहात कोविड सेंटर सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. लांजा शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर परिणाम
रत्नागिरी : बाजार समित्यांमध्ये किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद केल्याने शहरातील भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नव्यानेच भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना माल भरणेही कठीण बनले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बस स्थानकात शुकशुकाट
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे जिल्ह्यातील बससेवा बंद नसली तरी विविध स्थानकांवर शुकशुकाट आहे. त्याचा आर्थिक फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे.
कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण
चिपळूण : कोरोनासह अन्य कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत आणले जाते. साहजिकच येथील पालिका कर्मचारी आणि व्यवस्थापनावर प्रचंड ताण पडत आहे.
मैदाने बनताहेत मद्यपींचे अड्डे
लांजा : लॉकडाऊन काळात सध्या शहरातील परमीट रूम आणि वाईन शॉप बंद असताना, अशा परिस्थितीतही शहरातील विठ्ठल मंदिरशेजारील मैदान, साटवली रोड, जावडे रोड, नारकर पटांगण, गोंडेसखल रोड या परिसरातील मोकळी मैदाने अंधार पडताच मद्यपींचे अड्डे बनत आहेत.