तब्बल ६० तासांनी अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी खुला, दरडींचा धाेका वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:47 AM2024-08-27T11:47:14+5:302024-08-27T11:47:44+5:30
पाचल : मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली हाेती. ही दरड सोमवारी सायंकाळी ...
पाचल : मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली हाेती. ही दरड सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात बांधकाम विभागाला यश आले. तब्बल ६० तासांनंतर अणुस्कुरा घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यात शनिवारी पावसाचा जाेर वाढला हाेता. मुसळधार पावसामुळे राजापूर आणि काेल्हापूरला जाेडल्या जाणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड काेसळली हाेती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती. तब्बल तीन दिवस भर पावसात ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, माती हटवताना मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने व दगडांचा आकार मोठा असल्याने ते तीन ते चार वेळा ब्लास्ट करून हटवण्यात आले.
हा मार्ग बंद असल्याने कोकणात अणुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी गगनबावडा मार्ग निवडला होता. मात्र, अणुस्कुरा घाट बंद असल्याने घाट माथ्यावरून येणारी मालवाहतूक बंदच हाेती. मात्र, तब्बल तीन दिवसांनी साेमवारी सायंकाळी या मार्गावरील दरड हटविण्यात यश आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.
मार्ग ठरताेय साेयीचा
गेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईहून कोकणाकडे येणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची माहिती मिळाल्याने अनेकजण या मार्गाने कोकणात येतात. पुणे, कोल्हापूरहून राजापूर, सावंतवाडीला येण्यासाठीही हा मार्ग साेयीचा ठरत आहे. दिवसभरात पाचशे ते सहाशे वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. मात्र, घाटात दरडींचा धाेका वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागताे.