अभिनंदनीय! रत्नागिरीची कन्या अनुया करंबळेकर मेट्रोची लोको पायलट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:59 PM2022-11-28T15:59:52+5:302022-11-28T16:15:06+5:30
रत्नागिरीची कन्या मुंबईची मेट्रो चालविणार असल्याचा आनंद नाचणे पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुक्यातील रहिवाशांनी व्यक्त केला
रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे गावातील कन्या अनुया करंबेळकर हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीची कन्या मुंबईची मेट्रो चालविणार असल्याचा आनंद नाचणे पंचक्रोशी आणि संपूर्ण तालुक्यातील रहिवाशांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल अनुयाचे अभिनंदनही होत आहे.
अनुया हिचे वडील दिलीप करंबेळकर यांचा नाचणे येथे वेल्डींगचा व्यवसाय आहे. मुलीलाही या व्यवसायाची रुची असल्याने त्यांनी तिला व्यवसायाची माहिती दिली होती. याच आवडीमुळे अनुयाने शिर्के हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात एम. सी. व्ही. सी.(इलेक्ट्रॉनिक्स) मधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबईतील विवेकानंद महाविद्यालयातून इंस्ट्रुमेंशनचा डिप्लोमा पूर्ण केला.
शिक्षण घेत असतानाच तिला मुंबई मेट्रोचा संदर्भ मिळाला. पुढे तिने मुंबई मेट्रोच्या लोको पायलट या पोस्टसाठी लेखी परीक्षा, त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत, सायकोमेट्रिक टेस्ट आणि आरोग्य तपासणी असे टप्पे पार केले. या सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अनुया करंबेळकर हिची मुंबई मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती झाली आहे.