मुलांच्या वाढलेल्या वजनाने पालकांमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:13+5:302021-09-05T04:36:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाकाळात सुमारे पावणेदोन वर्षे घरात राहिलेल्या मुलांचे खाणे वाढले आहे. मात्र, टीव्ही आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाकाळात सुमारे पावणेदोन वर्षे घरात राहिलेल्या मुलांचे खाणे वाढले आहे. मात्र, टीव्ही आणि मोबाईलवर अधिकतर वेळ घालविण्यामुळे शरीराच्या हालचालीही थांबल्या आहेत. त्यामुळे मुलांचे वजन वाढले आहे. मात्र, यामुळे पालकांपुढे चिंता निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून म्हणजेच मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद झाली. सध्या मोठे वर्ग काहीअंशी सुरू झाले असले तरी लहान वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे ही सर्व मुले घरी आहेत. सध्या या मुलांना घरातील अन्न बऱ्याचअंशी मिळत आहे, ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली असली तरी सतत खाण्यामुळे वजन वाढू लागले आहे. त्यातच ही मुले बाहेर पडत नसल्याने खेळही बंद आहे. त्यामुळे शारीरिक हालचालीही थांबल्या आहेत.
...........................
डोळे आणि पचनाचे विकारही वाढले
मुले आता दिवसभर घरात राहिल्याने त्यांचे खेळणे थांबले आहे. घरी बसून तासन्तास टीव्हीसमोर बसणे किंवा मोबाईलवर गेम बघत राहाणे यामुळे पचनाचे विकार, लठ्ठपणा यात वाढ होत असून डोळ्यांवरही ताण येत आहे.
पालकांची चिंता वाढली
मुलं घरी आहेत. त्यामुळे सतत काहींना काही नवीन पदार्थ बनविण्याची फर्माईश असते; परंतु खाणे जास्त आणि व्यायाम काहीच नाही. यामुळे वजन वाढू लागले आहे.
- चिंतन तेंडुलकर, पालक, रत्नागिरी.
सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे घरचे नेहमीच खाण्याचा कंटाळा असतो. फास्टफूड खाण्याचा हट्ट मुलांकडून केला जात आहे. त्यातच मोबाईल-टीव्हीत लक्ष अधिक असल्याने एकाच ठिकाणी अधिक वेळ बसून राहतात.
- प्रेरणा काळे, पालक, चरवेली, रत्नागिरी.
....................................
तज्ज्ञ काय म्हणतात
मुलं शाळेत असताना भरपूर खेळतात. मात्र, आता घरी असल्याने सतत खाणे आणि मोबाईलवर राहण्याने त्यांचे वजन वाढतेय. पालकांनी त्यांना थोडेसे खेळायला द्यायला हवे. व्यायामाची सवय लावावी.
- डाॅ. रोहित पाटील, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी.
मुलांच्या ॲक्टिव्हिटी थांबल्याने लठ्ठपणात वाढ होत आहे. या काळात त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. ऑनलाईन अभ्यासामुळे काहीसा आत्मविश्वासही कमी होताना दिसतो. यातून त्यांची चिडचिडही वाढली आहे. डोळ्यांवरही परिणाम होताना दिसतात.
- डाॅ. गोकुळ देसाई, आयुर्वेदिक तज्ज्ञ, रत्नागिरी.