लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:25 AM2019-12-19T11:25:26+5:302019-12-19T11:27:33+5:30
अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.
शोभना कांबळे
रत्नागिरी : सामाजिक कृतज्ञता निधी संकलनाचे काम महाराष्टभर सुरू होते. या निधीला हातभार लावण्यासाठी डॉ. श्रीराम लागू यांनी पुढाकार घेऊन लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग मानधनाचा एकही पैसा न घेता महाराष्ट्रात केले आणि त्यातून निधी गोळा केला. या नाटकाच्या निमित्ताने डॉ. लागू रत्नागिरीत आणि चिपळुणात आले होते.
अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.
डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याच्या आठवणी हेगशेट्ये यांनी जाग्या केल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अभिजीत हेगशेट्ये यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती.
सामाजिक संस्थेत काम करताना पैशांची अपेक्षा कधीच केली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. दाभोलकर आणि डॉ. लागू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम १९९६-९७च्या सुमारास सुरू झाला होता.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, मालवण यानंतर रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी लग्नाची बेडी हे नाटक झाले. त्यावेळी डॉ. लागू यांच्यासह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी, रिमा लागू, भारती आचरेकर आदी मातब्बर कलाकार रत्नागिरीत आले होते.
डॉ. लागू यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल हेगशेट्ये म्हणाले की, डॉ. लागू हे मोठे व्यक्तिमत्व होते. मात्र, ते सामान्यांसारखेच राहिले. प्रत्यक्षात ते नटसम्राट होते. कित्येक दशके त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. रंगमंचावरील डॉ. लागू आणि प्रत्यक्षातील डॉ. लागू हे वेगळेच असायचे. ते पक्के तत्वनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होते.
सामाजिक जाणीव असल्याने सामाजिक बांधिलकी मानणारे होते. म्हणूनच लग्नाची बेडी या नाटकाचे सलग प्रयोग करताना नाटकाच्या टीममधील एकाही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने मानधनाचा एकही पैसा घेतला नाही. हे केवळ डॉ. लागूंमुळे झाले. कारण नाट्यक्षेत्रात त्यांचे दादा व्यक्तिमत्व होते.
तिकीट विक्रीतून १ लाख ६० हजार जमा
रत्नागिरीतील निधी संकलनासाठी जे. के. फाईल्सचे तत्कालिन सरव्यवस्थापक सर्वोत्तम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत आप्पा बेर्डे, भाई बेर्डे ही मंडळी होती. या सर्वांच्या सहकार्याने लग्नाची बेडी नाटकाच्या तिकीट विक्रीतून त्याकाळी तब्बल १ लाख ६० हजार रूपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी रत्नागिरीतून गोळा करण्यात आला होता. डॉ. लागू यांनी कोणतेही मानधन न घेता या नाटकाचे प्रयोग केले होते.