काव्या पेडणेकर यांची आगार प्रमुखपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:49+5:302021-07-07T04:38:49+5:30
रत्नागिरी : आगारात वाहकपदी रूजू झाल्यानंतर वेळोवेळी पदोन्नत्ती मिळवत सहाय्यक वाहतूक अधीक्षकपदी बढती मिळवली. रत्नागिरी आगारातील वरिष्ठ आगार व्यवस्थापक ...
रत्नागिरी : आगारात वाहकपदी रूजू झाल्यानंतर वेळोवेळी पदोन्नत्ती मिळवत सहाय्यक वाहतूक अधीक्षकपदी बढती मिळवली. रत्नागिरी आगारातील वरिष्ठ आगार व्यवस्थापक अजयकुमार मोरे यांची बीड येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी काव्या पेडणेकर यांची निवड झाली आहे. एकाच आगारात वाहक ते आगारप्रमुख असा यशस्वी प्रवास काव्या यांनी केला आहे.
काव्या पेडणेकर या २००९ साली रत्नागिरी आगारात वाहकपदी रुजू झाल्या. २०१५ साली सरळसेवा भरतींतर्गत झालेल्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. सहाय्यक वाहतूक अधीक्षकपदी त्यांची निवड झाली. लांजा आगारात स्थानकप्रमुख म्हणून त्यांनी आठ महिने सेवा बजावली. त्यानंतर रत्नागिरी विभागातील अपघात विभागात २०१६ साली त्यांची नियुक्ती झाली. २०१९ साली त्यांची वाणिज्य विभागात बदली झाली. त्यांची कामातील सचोटी, शिस्त, चिकाटी यामुळे त्यांची रत्नागिरी आगारप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आगारप्रमुख अजयकुमार मोरे यांना बीड विभाग नियंत्रकपदी पदोन्नत्ती मिळाली असून, मोरे यांनी पदभार स्वीकारला आहे. मोरे यांच्या रिक्त पदावर पेडणेकर यांची निवड झाली असून, त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.