जिल्हा उपनिबंधकपदी सोपान शिंदे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:35 AM2021-08-19T04:35:04+5:302021-08-19T04:35:04+5:30
टेंभ्ये : बराच काळ रिक्त असलेल्या रत्नागिरी जिल्हा उपनिबंधकपदी धुळे येथील सोपान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ...
टेंभ्ये : बराच काळ रिक्त असलेल्या रत्नागिरी जिल्हा उपनिबंधकपदी धुळे येथील सोपान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे या कार्यालयासमोर मोठे आव्हान असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये नुकतेच प्रसिद्ध केले होते.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांच्या कार्यालयामध्ये जिल्हा उपनिबंधकांपासून सहायक निबंधक व जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा उपनिबंधकपदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगवे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता या पदावर सोपान बापू शिंदे यांची बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते धुळे जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत असून, शुक्रवार २० ऑगस्ट रोजी रत्नागिरीत रुजू होणार आहेत.
अजूनही सहायक निबंधक प्रशासन व तालुकास्तरावरील सहायक निबंधकांची पदे रिक्त असून, तीही तत्काळ भरणे आवश्यक आहे. जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी रिक्त आहेत. कोरोना कालावधीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. १ सप्टेंबरपासून या निवडणुकांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या कार्यालयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असणे आवश्यक आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदारयादी तयार करण्यास सुरुवात झाली आहे ही निवडणूक घेणेही या कर्मचाऱ्यांच्यासमोर मोठे आव्हान बनणार आहे.
..............
‘लोकमत’ने वाचा फोडली
सहकारी संस्थांची संख्या कमी असल्याने जिल्हा उपनिबंधक, तसेच त्यांच्या कार्यालयातील आणि तालुका स्तरावरील पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने मांडला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना आता सहकारी संस्थांच्या निवडणूक कामाचा बोजा त्यांना पेलावा लागणार आहे. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्याचा मुद्दा ‘लोकमत’ने मांडला आहे.