बांधकाम अधिकाऱ्यांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:27+5:302021-08-18T04:37:27+5:30
असगोली : अवघ्या ३० दिवसांत पालशेत पूल चालू केल्याबद्दल गुहागर भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभिनंदन करण्यात ...
असगोली : अवघ्या ३० दिवसांत पालशेत पूल चालू केल्याबद्दल गुहागर भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभिनंदन करण्यात आले.
सागरी महामार्गाचा प्रमुख टप्पा असलेला गुहागर तालुक्यातील मोडका आगर तवसाळ या मार्गावरील पालशेत गावातील बाजार पूल महिनाभरापूर्वी दुरुस्तीच्या व कमकुवत झाल्याच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांच्याकडून बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे काम नव्याने हाती घेतलेल्या उपअभियंता निकम यांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर तातडीने पुलाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन भाजपा तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांना दिले होते. त्यानुसार नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर ढासळलेल्या पिलरची दुरुस्ती करण्यात आली. पुलाच्या इतर भागाचे सिमेंट, रेतीच्या साह्याने पॉइंटिंग करण्यात आल्याचे उपअभियंता निकम यांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता जटाळ, उपअभियंता निकम, सहायक अभियंता नित्सुरे, घोरपडे यांच्यासमवेत पाहणी केली आणि त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. या कार्यतत्परतेबद्दल भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी सुर्वे यांच्यासमवेत भाजपचे तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरपंचायत गटनेते उमेश भोसले उपस्थित होते.