विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:31+5:302021-04-07T04:31:31+5:30
राज्यस्तरीय स्पर्धेत यश रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची नुकतीच टेक्नोवेव्ह २०२१ राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. ...
राज्यस्तरीय स्पर्धेत यश
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाची नुकतीच टेक्नोवेव्ह २०२१ राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन व आयटीआयमधील दोन विषयांवर सेमिनार आयोजित केले होते. नऊ महाविद्यालयातील १७९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
मुदतवाढीची मागणी
आरवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बांधकाम व्यवसायास कमालीची मंदी आली असून, हातपाटी वाळू व्यवसाय संकटात सापडला आहे. भरलेली रॉयल्टीची रक्कमही वसूल झालेली नाही. यामुळे रॉयल्टी वैधतेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी हातपाटी व्यावसायिकांच्या वतीने योगेश रेडीज यांनी निवेदन देऊन जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याकडे केली आहे.
टॉवर सुरू करण्याची मागणी
दापोली : तालुक्यातील उन्हवरे, दाभिळ, पांगारी व दुर्गम परिसरातील भारत संचार निगमची सेवा ठप्प आहे. त्यामुळे परिसरातील मोबाइलधारक हैराण झाले आहेत. सध्या ऑनलाइन कामकाज सुरू असून, महावितरणचे वीज बिल न भरल्यामुळे दाभिळ, पांगारी येथील टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
कळंबस्ते संघ विजेता
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा पारकरवाडा येथे नमाजी नाना मैदानावर भरविण्यात आलेल्या डे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत कळंबस्ते संघाने विजेतेपद पटकाविले आहे. एमसीसी संघ स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. स्पर्धेत २६ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाला ५,५५५ तर उपविजेत्या संघाला ३,३३३ रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
समाजभूषण पुरस्कार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ मापारी मोहल्ला येथील जमातुल मुस्लिमीन जमातीचे सचिव बशीरभाई अल्लीखान यांना विश्व समता भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या बशीरभाई यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जनजागृती मोहीम
खेड : सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग वाढला असून कोरोना रोखण्यासाठी शासनाकडून कठोर निर्बंध जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी खेड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी खेड शहरातील बाजारपेठेत तसेच प्रत्येक चौकात फिरून नागरिकांना मार्गदर्शन केले.
रस्त्याची दुरवस्था
दापोली : तालुक्यातील कुटाचा कोंड ते टेटवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संबंधित रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. डांबरीकरण उखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
प्रबोधन यात्रा
रत्नागिरी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा’ यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १० एप्रिल ते दि.३० मे अखेर प्रबोधन यात्रा आयोजित केली आहे.
मुबीन जुवळे यांचा सत्कार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई मुस्लिम मोहल्याचे सुपुत्र व मुंबईतील इंटेलिजन्सी झोनल युनिटमध्ये वरिष्ठ अधिकारी असलेले मुबीन कादीर जुवळे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इंटेलिजन्सी ऑफिसर डायरेक्टर जनरल ऑफ रिव्हेन्स इंटेलिजन्स झोनल युनिटमध्ये १९९२ पासून ते कार्यरत होते.