विकास कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:25+5:302021-04-30T04:39:25+5:30

आवाशी : खेड तालुक्यातील तळेगावच्या विकासासाठी आमदार योगेश कदम हे प्रयत्नशील आहेत. तळे, चिंचगावच्या विकास कामांसाठी सुमारे १ कोटीपेक्षा ...

Approval of development works | विकास कामांना मंजुरी

विकास कामांना मंजुरी

Next

आवाशी : खेड तालुक्यातील तळेगावच्या विकासासाठी आमदार योगेश कदम हे प्रयत्नशील आहेत. तळे, चिंचगावच्या विकास कामांसाठी सुमारे १ कोटीपेक्षा अधिक निधी कामांना आमदार कदम यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गावातील विकास कामे लवकरच पूर्णत्वाला जाणार आहेत.

टँकरने पाणी पुरवठा

खेड : सध्या तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. या अनुषंगाने तालुक्यातील आठ गावे, ११ वाड्यांना एक शासकीय आणि दोन खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यात खवटी, खालची, वरची धनगरवाडी, आंबवली, भिंगारा, सवणस, खोपी आदी वाडी व गावांचा समावेश आहे.

प्रशासकांची नेमणूक

दापोली : तालुक्यातील इनाम पांगारी, गावतळे, नवसे व फणसू या चार ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. कोरोना काळात निवडणुका होणे असंभव असल्याने इनामपांगारी आणि गावतळे या दोन ग्रामपंचायतीवर प्रशासक आधीच नेमण्यात आला आहे तर फणसू आणि नवसे ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना जागृती मोहीम

शिरगाव : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. या अनुषंगाने सध्या लसीकरण मोहिमेला प्रारंंभ झाला आहे. मात्र अनेक नागरिकांमध्ये लसीबाबत गैरसमज असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने चिपळूण तालुक्यातील अलोरे वरचीवाडीतील क्रांती युवा मंडळाने पुढाकार घेत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.

ढगाळ वातावरण कायम

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात गेला आठवडाभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन असले तरी बहुतांश वेळी ढगाळ वातावरण असते. याचा फटका आंबा, काजूच्या दुसऱ्या टप्प्यातील फळधारणेवर विपरीतरित्या बसू लागला आहे.

डांबरीकरण उखडले

लांजा : डोर्ले, हर्चे रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील हर्चे गावाला रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले गावाने या रस्त्याच्या माध्यमातून जोडले आहे. दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र वर्दळ वाढल्याने हे डांबरीकरण उखडले आहे.

शाळा दुरुस्तीसाठी निधी

देवरुख : समग्र शिक्षा अभियानांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील केवळ तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. गतवर्षी तालुक्यातील २५ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे निधी वितरण स्थगित केले होते. यंदाही २४ शाळांचे प्रस्ताव पाठविले होते.

कोविड केअर सेंटरला मदत

मंडणगड : येथील पंचायत समितीच्या वतीने कोविड केअर सेंंटरला स्टिमर, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, हिटर, बादल्या, साबण आदी वस्तूंची देणगी देण्यात आली आहे. गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे आणि सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने या कोविड केअर सेंटरमधील २८ रुग्णांसाठी ही भेट देण्यात आली आहे.

इमारतीचे सॅनिटायझर

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक इमारतींमध्येही आता मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. शहरातील ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडत आहेत तो परिसर यापूर्वी सिल केला जात असे. यावेळीही रुग्ण सापडल्यास तो परिसर संपूर्ण सॅनिटायझर करावा, अशी मागणीही नागरिक करीत आहेत.

मच्छीमार हवालदिल

गुहागर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जमावबंदी आणि संचारबंदी लागू केल्याने मच्छीमार व्यवसायावर गंडांतर आले आहे. कोकणासह महाराष्ट्रातील मच्छीमारी व मासेविक्रीला याचा मोठा फटका बसला आहे. मासळी हंगामही आता संपत आला आहे. डिझेल परतावा मदतही तुटपुंजी मिळाली आहे. त्यामुळे सध्या मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

Web Title: Approval of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.