फुणगूस - डिंगणी मार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:23+5:302021-07-07T04:39:23+5:30
गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातून जाकादेवी - पोचरी - फुणगूस - डिंगणी मार्गे संगमेश्वर या अंतर्गत ...
गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातून जाकादेवी - पोचरी - फुणगूस - डिंगणी मार्गे संगमेश्वर या अंतर्गत मार्गाच्या विस्तारीकरणासाठी बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास सुखकर हाेणार आहे़
गणपतीपुळे - जाकादेवी - पोचरी - फुणगूस - डिंगणी हा रस्ता जाकादेवी ते शास्त्री पूल संगमेश्वरपर्यंत एकेरी मार्ग आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच हा मार्ग डोंगराळ भागातून गेल्याने त्या रस्त्याला अनेक वळणे, चढ-उतार आहेत. गणपतीपुळेकडे जाणारा जवळचा मार्ग गुगल मॅपवरही दाखवत असल्याने प्रवासादरम्यान फक्त पर्यटकांना चुकीच्या मार्गाने जात तर नाही ना अशी शंका येत आहे.
जाकादेवी ते शास्त्री पूल संगमेश्वरपर्यंत रस्त्यांचे विस्तारीकरण व राज्य मार्गाचा दर्जा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेशही काढले आहेत. या रस्त्याला महामार्गाचा दर्जा देऊन दुपदरी रस्ता मंजूर व्हावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. मुंबई, पुणेकडून महाड - चिपळूण मार्गे येणारे भक्त पर्यटक व चाकरमानी निवळीमार्गे प्रवास करतात. जाकादेवी - पोचरी - फुणगूस - डिंगणीमार्गे शास्त्री पूल संगमेश्वर या मार्गाने प्रवास केल्यास सुमारे १७ किलोमीटर अंतर वाढते. त्यामुळे होणारा त्रास, वेळ व पैसा वाचून भक्त, पर्यटक व चाकरमान्यांना वेळेआधी पोहोचता येणार आहे.
-----------------------------
रस्त्यासाठी ६.९ काेटी मंजूर
रस्त्याच्या कामासाठी ६ कोटी ९ लाख रुपये मंजूर आहेत. सध्या हा रस्ता ३.७५ मीटरचा असून, तो १५ मीटरचा होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे येता-जाता पर्यटकांना काेकणातील निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटन वाढीसाठी हा रस्ता उपयुक्त असून, मुंबईच्या चाकरमान्यांनाही हा रस्ता फायद्याचा ठरणार आहे.