दाभोळ ते चिपळूण जलमार्गाला मंजुरी, कामे लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन
By संदीप बांद्रे | Published: August 1, 2023 09:34 PM2023-08-01T21:34:49+5:302023-08-01T21:35:13+5:30
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची आमदार शेखर निकम यांनी घेतली भेट
संदीप बांद्रे / चिपळूण : दाभोळ ते पेढे जलमार्ग, चिपळूण शहर पूर नियंत्रण प्रकल्प तसेच पर्यटन संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय बंदर नौकानयन, जल वाहतूक आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आणि कपूर उपस्थित होते. दाभोळ ते पेढे (गोवळकोट) या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २८ आणि पेढे येथील नियोजित 'रोरो आयडब्ल्यूटी टर्मिनल'ला मंजुरी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल आमदार निकम यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांचे या भेटीत आभार मानले. या जलमार्गाच्या विकासामुळे मालवाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायाला ही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या जलमार्गाच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांचे गेले दोन वर्ष श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या प्रकल्पामुळे चिपळूण शहराच्या पूर नियंत्रणाला ही फायदा होणार आहे.
चिपळूण शहर पूर नियंत्रणाबाबत केंद्राकडे पाठवायच्या प्रस्ताबाबत आमदार निकम यांनी श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केली. यासाठी संपूर्ण वाशिष्टी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत सखोल सर्व्हे आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्याचीही माहिती यावेळी नाईक यांना दिली. चिपळूण शहर पूर नियंत्रणासाठी आमदार निकम यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि बंदर नौकानयन, जलवाहतूक मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या कामांव्यतिरिक्त आपल्या मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पर्यटन विकासाच्या कामाबाबतही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामांबाबतही आमदार निकम यांनी यावेळी नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या तिन्ही कामाबाबत नाईक हे खूपच सकारात्मक असल्याचे यावेळी समोर आले आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांच्यासह उपस्थितांनी केंद्रीय मंत्री नाईक यांचे आभार मानले आहेत.