रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:38 PM2024-10-05T12:38:00+5:302024-10-05T12:38:31+5:30

एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प

Approval of two projects worth 29 thousand 550 crore investment in Ratnagiri | रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मान्यता

रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मान्यता

मुंबई : रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटी रुपये गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८ हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणूक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सिलीकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी निर्मितीचा राज्यातील हा तिसरा अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प वाटद व झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे. या प्रकल्पामध्ये १९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक होऊन ३३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा असून, तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक होऊन ४५०० रोजगार निर्मिती होणार आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. सदर प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविला.

Web Title: Approval of two projects worth 29 thousand 550 crore investment in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.