एप्रिल, मे महिन्यात सामान्य तापमानापेक्षा राहणार अधिक तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:55+5:302021-04-08T04:31:55+5:30
रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही ...
रत्नागिरी : मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी झाले असून मंगळवारपासून मळभाचे आच्छादन दिसू लागले आहे. एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक तापमानाचे मानले जातात. मात्र, यावर्षी या कालावधीतील तापमानापेक्षा साधारणत: एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढलेले राहील, असा अंदाज दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान सल्ला केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. गेल्या आठवड्यात कमालीची उष्णता वाढली होती. मात्र, आता पुन्हा सामान्य वातावरण आहे. मंगळवारपासून जिल्ह्यात मळभाचे वातावरण निर्माण झाले असून कधीही पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत माहिती देताना डाॅ. मोरे म्हणाले की, मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण, तामिळनाडू, कर्नाटक आदी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाढलेले तापमान काहीअंशी कमी झाले आहे.
भारत मोसम विज्ञान विभागाकडून (आय. एम. डी.) या हवामान केंद्राकडे प्रत्येक पाच दिवसांनी हवामानाचा अंदाज पाठविला जातो. त्यानुसार दोन आठवड्यांपूर्वी तापमानात वाढ झाली होती आणि आर्द्रता कमी झाली होती. मात्र, आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता तापमान खाली आले आहे. मात्र, या एप्रिल, मे महिन्यात नेहमीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले रहाणार आहे. आय. एम. डी. कडून आलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने ७ ते ११ एप्रिल या कालावधीत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. त्यानंतर मात्र, नेहमीपेक्षा कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आय.एम. डी. कडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नेहमीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असल्याचे या केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
कोट..........
यावर्षी तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ राहणार आहे. एप्रिल आणि मे हे दोन महिने सर्वाधिक तापमानाचे मानले जातात. या महिन्यात १ ते २ अंश सेल्सिअसने तापमान वाढलेले राहणार आहे.
डाॅ. विजय मोरे, नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली