पक्षाच्या कामाचा ठेका फक्त कार्यकर्त्यांनीच घेतलाय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:53+5:302021-07-17T04:24:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोना कालावधीत तालुक्यातील शिवसैनिकांच्या अनेक कुटुंबांतील व्यक्ती मृत झाल्या. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोना कालावधीत तालुक्यातील शिवसैनिकांच्या अनेक कुटुंबांतील व्यक्ती मृत झाल्या. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यांची साधी चौकशीही केली नाही. मदत सोडाच धीर देण्याचे पण काम केले नाही. मोठमोठी कामे आली की वरिष्ठांच्या तिथे उड्या पडतात. मात्र, पक्षाच्या कामाच्या वेळी मागे राहायचे. पक्षाच्या कामाचा ठेका फक्त सामान्य कार्यकर्त्यांनी घेतलाय का? असा संतप्त प्रश्न शिवसेना कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित केला. या बैठकीत झालेल्या वादळी चर्चेविषयी शहरात दिवसभर गरमागरम चर्चा सुरू होती.
शिवसंपर्क अभियानाच्या नियोजनसाठी तालुकाप्रमुख शिंदे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभरात २२ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पंचायत समिती गणात बैठका होणार आहेत. या दौऱ्यात खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या या बैठकीतच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. बैठकीला जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, क्षेत्रप्रमुख, हे बडे पदाधिकारी हजर नसल्याने त्याचा धागा पकडून एका उपशहरप्रमुखाने शिवसैनिकातला संताप व्यक्त केला.
सामान्य कार्यकर्ता रात्रंदिवस मरिमर मरतो पण आज तो अडचणीत असताना त्याला कुणी विचारात घेत नाही, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने लोकांचे हाल होत आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरले, पण वरिष्ठांनी त्याकडे किती लक्ष दिले. पक्षाचा जीवावर मोठ-मोठी कामे घ्यायला, पार्ट्या करायला वेळ मिळतो. पण पक्षाच काम आलं की कोरोना आडवा येतो. हे काय चाललंय. निष्ठावंत बोलत नाहीत, याचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांना गृहीत धरून चालणार असाल तर परिणाम वाईट होतील, असेही एका कार्यकर्त्याने सुनावले. एवढेच नव्हे तर नेत्यांची भाषणं ऐकून आम्ही कंटाळलो आहोत, अशा शब्दांत अनेकांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.