योग्य उपचार मिळत आहेत ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:49+5:302021-04-23T04:34:49+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी कोविड सेंटरला भेट देऊन ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुरुवारी कोविड सेंटरला भेट देऊन उपचारांबाबत कोरोना रुग्णांशी चर्चा केली. कोविड योध्दा म्हणून काम करणारे शिक्षक आणि राजरत्न प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप मारल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी ‘मी जबाबदार कोविड योध्दा, रत्नागिरी’ या स्लोगनच्या टी-शर्टचे कोविड योद्ध्यांना वाटपही करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी कोविड योद्ध्यांना धीर देऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप मारण्याचे काम जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करीत आहेत. त्यासाठी हे दोघेही खांद्याला खांदा लावून सूक्ष्म नियोजन करून छोट्या-छोट्या बाबींची दखल घेत नागरिक, कोरोना रुग्ण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस करीत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी स्वत: जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, सहायक कार्यक्रम अधिकारी आर. के. कांबळे यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष, ग्राम कृती दल, चेकपोस्ट, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, रेल्वेस्थानक तपासणी केंद्र यासह विविध ठिकाणी सुरू असलेली कोविड चाचणी केंद्रे व लसीकरण केंद्रे यांच्या कामकाजाबाबत त्यांनी आढावा घेतला. तसेच ग्रामस्तरावर उतरुन प्रत्यक्ष काम करण्यावर भर देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह रत्नागिरी रेल्वेस्थानक, मारुती मंदिर, शिर्के हायस्कूलसह अनेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी रेल्वे स्थानकावर रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांशी थेट संवाद साधला. त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच रेल्वे स्थानकावर नियुक्त शिक्षक, राजरत्न प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कोरोना रुग्णसंख्या घटण्यास मदत होईल
कोविड-१९ साठी तैनात केलेले कोविड योध्दे चांगले काम करत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. याबाबत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करीत सर्वांचे कौतुक केले.