रेल्वे प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का? : शाैकत मुकादम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:20+5:302021-06-04T04:24:20+5:30
चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने ...
चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने या गाड्यांमधून प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का, असा प्रश्न कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा शासनाचा निर्णय योग्य असला तरी कोकण रेल्वेच्या मार्गावर दररोज जाणाऱ्या व येणाऱ्या २० रेल्वे गाड्या धावत आहेत. यामध्ये मंगला, नेत्रावती, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. जिल्हा व तालुका या ठिकाणी यांच्यातील काही गाड्या थांबत असून, रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी प्रवासी उतरत आहेत. रेल्वेस्थानकावर असणारी कॅन्टीन, फेरीवाले व कर्मचारी यांच्याशी प्रवाशांचा संपर्क होतो. जिल्ह्यामधून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या लॉकडाऊन असेपर्यंत बंद करण्यात याव्यात, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे. परजिल्ह्यांतील लोकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांशी संपर्क आला, तर लाॅकडाऊनचा काय उपयोग, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे़