मास्क लावण्यावरून वाद, एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:58+5:302021-05-06T04:33:58+5:30
चिपळूण : मास्क लाव, असे सांगितल्याच्या रागातून एकाने दुसऱ्याला काठीने मारहाण केल्याची घटना मंगळवारी तालुक्यातील पोफळी नाका रिक्षा स्टॉप ...
चिपळूण : मास्क लाव, असे सांगितल्याच्या रागातून एकाने दुसऱ्याला काठीने मारहाण केल्याची घटना मंगळवारी तालुक्यातील पोफळी नाका रिक्षा स्टॉप येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोंडीराम धोंडीराम येडगे ( पोफळी ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद मधुकर बाबाजी इंदुलकर (६१, कोंडफणसवणे, ता. चिपळूण) यांनी दिली आहे. ते या मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूलकर हे कामानिमित्त पतसंस्थेत जात होते. त्यावेळी तालुक्यातील पोफळी नाका रिक्षा स्टॉप या ठिकाणी येडगे उभा होता. तो इंदुलकर यांच्याजवळ येऊन काही तरी बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी येडगेला आधी मास्क लाव व नंतर माझ्याशी बोल, असे सांगितले. याचा येडगेला राग आल्याने त्याने इंदुलकर यांना शिवीगाळ केली. यानंतर इंदुलकर हे पतसंस्थेत गेले. तेथून ते परत घरी जात असताना येडगे याने पुन्हा त्यांना गाठून शिवीगाळ केली आणि लाकडी काठीने डोक्यावर फटका मारला.
या घटनेनंतर इंदुलकर यांनी येडगेविरोधात तक्रार दिल्यानुसार अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.