घरच्यांसमोर मारलेल्या थापेमुळे अर्जुन गोत्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:42+5:302021-05-06T04:33:42+5:30
रत्नागिरी : आपण कलेक्टर झालो आहोत, ही घरच्या लोकांसमोर मारलेली थाप पचावी, यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदावर आपली नियुक्ती झाल्याचे ...
रत्नागिरी : आपण कलेक्टर झालो आहोत, ही घरच्या लोकांसमोर मारलेली थाप पचावी, यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदावर आपली नियुक्ती झाल्याचे पत्र अर्जुन सकपाळ याने तयार केले आणि हेच पत्र व्हायरल झाल्यामुळे आता तो चांगलाच गोत्यात आला आहे. या प्रकरणात त्याला सहकार्य करणाऱ्या अक्षय आनंदा बुडके या त्याच्या मित्राला पोलीसांनी अटक केली आहे.
लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेला अर्जुन त्यात पास झाला नाही. मात्र आपण पास झालो असल्याचे त्याने घरच्या लोकांना तसेच शेजाऱ्यांना सांगितले. आपले म्हणणे खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्याने महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करुन आपली नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर झाली असल्याचे बनावट पत्र तयार केले. हेच पत्र व्हायरल झाले. या पत्रात त्याने केवळ रत्नागिरी जिल्हाधिकारीच नाही तर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचीही बदली झाली असल्याचे नमूद केले होते.
रवविवारी सायंकाळी हे पत्र व्हायरल झाले आणि हे पत्र बनावट असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याची सूचना केली आणि त्यात राजापूर तालुक्यातील ओणी येथे एका रिसॉर्टवर राहण्यासाठी आलेला अर्जुन जाळ्यात सापडला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. घरचे लोक आणि शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी आपण हे बनावट पत्र तयार केले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या साऱ्यामध्ये त्याला मदत केल्याप्रकरणी अक्षय आनंदा बुडके (२८, रा. कोथळी, करवीर, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे. अक्षयला रत्नागिरी शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे रत्नागिरीतच अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असते त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर करीत आहेत.
अक्षयने अर्जुन सकपाळला मदत केली असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. मात्र त्याने नेमकी कशी आणि काय मदत केली, त्यात त्यांचा हेतू काय होता, हे अजून उघड झालेले नाही.
अर्जुन सकपाळ याने अन्य कोणाला फसवले असेल किवा त्या व्यक्तीविषयी अजून काही माहिती असल्यास रत्नागिरी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी केले आहे.