रत्नदुर्ग किल्ल्यावर उद्या साजरा होणार आरमार विजय दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 04:07 PM2018-11-24T16:07:01+5:302018-11-24T16:20:02+5:30
शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी
रत्नागिरी : शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी समाज आणि अठरा पगड समाजांच्यावतीने रविवार, २५ रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर ‘आरमार विजय दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शोभायात्रा तसेच इतिहास संशोधक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. अजिंक्य समजल्या जाणाºया इंग्रजांना १८ सप्टेंबर १६७८ रोजी समुद्री हल्ल्यात पराभूत करण्याचा असामान्य पराक्रम रत्नागिरीचे सुपुत्र दर्यासारंग मायनाक भंडारी, दौलतखान आणि अठरा पगड जातींच्या त्यांच्या शिलेदारांनी केला. त्यामुळे बहुजन समाजाचा हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी १८ सप्टेंबर हा दिवस आरमार विजय दिन म्हणून गेल्या काही वर्षांपासून तालुका भंडारी समाज तसेच बहुजन समाजातर्फे साजरा करण्यात येत आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर हा आरमार विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. तालुका भंडारी समाजाबरोबरच कुणबी समाजोन्नती संघ, तेली सेवा संघ, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, खारवी समाज विकास समिती, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ, लिंगायत सेवा संघ, नामदेव शिंपी समाज मंडळ, परिट समाज सेवा संघ, भोई समाज, धनगर समाज संघ, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, कोळी समाज, सुतार समाज संघ, गाबित समाज, कुंभार समाज, आगरी समाज आदींच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दुपारी ३.३० वाजता भागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या वेषभूषा केलेल्या समाजबांधव यात सहभागी होणार आहेत. यावेळी रत्नदुर्ग किल्ला येथे भागोजीशेठ कीर यांच्या नावाच्या पाटीचे अनावरण होणार आहे. त्यानंतर याठिकाणी इतिहास संशोधक तसेच विविध समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.