सेना-भाजपचे मंत्री भ्रष्ट
By admin | Published: June 7, 2016 10:49 PM2016-06-07T22:49:01+5:302016-06-08T00:16:22+5:30
नारायण राणे यांचा आरोप : पावसाळी अधिवेशनात जाब विचारणार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर निष्क्रिय असून युती शासन सत्तेत आल्यापासून कोकणाला कोणी वालीच नाही असे समजून अन्याय सुरू आहे. राज्य शासनाने निधीच उपलब्ध करून दिला नसल्याने अनेक प्रकल्प रखडले आहेत. शिवसेना-भाजपचे सर्वच मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ खडसेंची भाजपने विकेट काढली, असा आरोप काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केला.
आगामी पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांचा भ्रष्टाचार, दुष्काळ आणि राज्याचा विकास याबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
विधान परिषदेत बिनविरोध निवड झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथमच आलेल्या नारायण राणे यांनी मंगळवारी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, रणजित देसाई, अशोक सावंत, सुरेश सावंत, संदीप कुडतरकर, मधुसूदन बांदिवडेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गाबरोबरच राज्यात विकासकामे ठप्प आहेत. मराठवाड्यात दुष्काळ असून प्यायला पाणी नाही. त्याठिकाणी अद्याप शेतकऱ्यांना बियाणेही दिलेले नाही. कोकणातील आंबा बागायतदारांवरही अन्याय होत आहे. युती शासनाने त्यांची चेष्टा केली आहे. गतवर्षी हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक झाडाला फक्त ६५ रुपयेच नुकसानभरपाई मिळाली, तर नुकसानभरपाईचा निधीही मागे गेला आहे. ही शासनाची नामुष्की आहे. त्यामुळे निव्वळ घोषणा देणारे हे शासन आहे. राज्य शासनच संपूर्ण भ्रष्ट आहे. दिवसेंदिवस महागाई भडकते आहे. मात्र, जाहिराती करण्यात शासन आघाडीवर आहे. नवीन घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात आहे. (वार्ताहर)
पालकमंत्री बुद्धू
राणे म्हणाले, सिंधुदुर्गच्या आगामी जिल्हा नियोजन बैठकीत निधीबाबत पालकमंत्र्यांचे पितळ उघडे पडेल. तसेच त्यांनी खोटी माहिती दिली तर हक्कभंगही दाखल केला जाईल. पालकमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि अज्ञानामुळे जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. सी वर्ल्ड, चिपी विमानतळ, पोर्ट ही कामे रखडली आहेत. ही कामे पूर्ण झाली असती तर येथील रोजगाराच्या संधी वाढल्या असत्या. येथील दरडोई उत्पन्न वाढेल. मात्र, या कामांना खीळ बसली आहे. गोव्यातील विमानतळासाठी महाराष्ट्र शासन आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री प्रयत्नशील आहेत. अशी सध्याची स्थिती आहे. विमानतळाबाबत पालकमंत्री पूर्ण अज्ञानी आहेत. पार्किंग व्यवस्था व त्यामुळे वाढणारे उत्पन्न याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे ते अज्ञानी व बुद्धू पालकमंत्री आहेत, असेही राणे यावेळी म्हणाले.
नो कॉमेंटस्
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी राजीनामा दिला आहे. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीत फटका बसेल काय? आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभारामुळे पक्षाचे नुकसान होत आहे काय ? या पत्रकारांच्या दोन्ही प्रश्नांना नारायण राणे यांनी नो कॉमेंटस् म्हणत उत्तर देणे टाळले.
पक्षाध्यक्षांचे आभार !
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी विधान परिषदेची उमेदवारी मला दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.
माझी बिनविरोध निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध माध्यमांतून माझे अभिनंदन करण्यात आले. माझे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करणाऱ्यांचाही आभारी असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.
खडसेंवरच कारवाई का ?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ खडसेंची विकेट घेण्यात आली आहे. फडणवीस सरकारमधील सर्वच मंत्री भ्रष्टाचारी आहेत. सर्वच खात्यात भ्रष्टाचार असून बळी फक्त खडसे पडले आहेत. एकाच दिवसात तीन ते चार तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात आल्या आहेत; परंतु खडसेंविरुद्ध हे षड्यंत्र करणारा भाजप शासनातीलच कोणी तरी आहे. भाजपच्या महाजन, गिरीष बापट अशा इतर मंत्र्यांवरही यापूर्वी आरोप झाले. मात्र, त्यांची चौकशी झालेली नाही. फक्त खडसेंवरच कारवाई का करण्यात आली? असा प्रश्नही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.