सेना - मनसेतच टक्कर
By admin | Published: October 30, 2016 11:50 PM2016-10-30T23:50:26+5:302016-10-30T23:50:26+5:30
खेड नगरपालिका : दुसऱ्यांदा होणाऱ्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस
खेड : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने मनसे व आघाडीच्यावतीने वैभव खेडेकर यांनी तर शिवसेनेच्यावतीने उद्योजक बिपीन पाटणे यांनी अर्ज भरला आहे़ पालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून, येथील दोन दिग्गजांमध्ये ही थेट निवडणूक होत असल्याने अवघ्या खेडवासीयांचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे़ या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार अॅड. मिलिंद जाडकर यांची झालेली ‘एंट्री’देखील महत्त्वाची ठरणार आहे.
गेली १० वर्षे याठिकाणी महिला नगराध्यक्ष काम पाहत आहेत़ सन २००१मध्ये खेड पालिकेची निवडणूक काहीशी एकतर्फी झाली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठीची ती पहिलीच निवडणूक होती़ त्यावेळी शिवसेनेच्या वैशाली कवळे या खेड पालिकेत पहिल्या थेट नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर २००५मधील पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा महिला आरक्षण पडले होते. यावेळी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला बहुमत मिळाले होते़ तर शिवसेना बॅकफूटवर गेली होती़ त्यावेळी पालिकेत प्रथमच मनसेपेक्षा जास्त नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आल्याने अगोदर ठरल्याप्रमाणे शुभांगी टाकळे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. मात्र, राष्ट्रवादी व मनसेची सत्ता असतानाही मनसेचे २ नगरसेवक शिवसेनेचे रामदास कदम यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झाले. यामुळे शिवसेना पुन्हा सत्तेत आली़ नगराध्यक्षा शुभांगी टाकळे यांच्या कामाबाबतही नागरिक समाधानी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे टाकळे यांना पदावरून दूर करण्याबाबत मनसे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्येही एकमत झाले होते़ याचाच परिणाम म्हणून खेड पालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आली़
त्यावेळी मनसेच्या २ नगरसेवकांनी शिवसेनेला सहकार्य केल्याने शिवसेनेच्या रईसा मुजावर या अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या़ यानंतर २०११ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मनसेचे ९ नगरसेवक निवडून आल्याने पालिकेची सत्ता पुन्हा मनसेच्या हाती आली़ यावेळी मनसेचे ९, शिवसेना ७ व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे बलाबल पालिकेत होते़ विद्यमान पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा २०१०मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर विधानसभा मतदार संघात पराभव झाल्याने काहीकाळ ते खेडमधील राजकारणापासून दुर राहिले़ खेड पालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी रस दाखविला नसल्याने आणि एकूणच राजकारणापासून ते अलिप्त राहिल्याने खेड पालिकेवरील शिवसेनेची पकड काहीशी सैल झाल्याचे दिसून आले. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत सत्ता स्थापनेपुरते का होईना यश मिळाले़ मनसेने पालिकेतील आपल्या ५ वर्षाच्या कार्यकालात काही चांगली विकासात्मक कामे केल्याचे नागरिकांमधून ऐकावयास मिळते. सध्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या कामांचे मोजमाप झाल्यास या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येईल, हे सांगणे अवघड आहे़
मनसेचे वैभव खेडेकर हे दूरदृष्टीपणा आणि राजकीय मुत्सद्देगिरी यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत़ त्यांचे आकर्षक व्यक्तीमत्व अनेकांच्या चर्चेचा विषय बनले आहे़ शिवसेनेत असताना त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत तत्कालिन आमदार रामदास कदम यांच्या सान्निध्यात राहून राजकीय धडे गिरवले आहेत. तसेच राजकारणात त्यांचा विशेष बोलबाला हा विकासाच्या कामातही राहिला आहे़ राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची घोषणा केल्यानंतर वैभव खेडेकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला आणि वैभव खेडेकर यांची खरी राजकीय कारकीर्द सुरू झाली़
मनसेच्यावतीने शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्या घेऊन त्यांनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. यावेळी वैभव खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अनेक गुन्हेदेखील दाखल झाले. नगरपालिकेतील सत्तापदाच्या काळात तर ते शहर विकासाबाबत सदैव जागरूक राहिले आहेत. तर अंतिम वर्षात त्यांनी काही लक्षात राहतील अशी विकासकामे पालिकेच्या माध्यमातून केली़ आहेत. यामध्ये रस्ते, गटारे आणि सांस्कृतिक भवनसारखी कामे आजही येथील नागरिकांच्या लक्षात राहिली आहेत. तसेच पथदीपासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प खेडेकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले आहेत. खेड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खेडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेले मदतकार्य व नगरपालिकेला स्वच्छतेकामी केलेले सहकार्य येथील नागरिकांच्या कायम लक्षात राहण्यासारखे आहे़ याचा लाभ त्यांना कितपत मिळतो हे निकालानंतर कळेल. (प्रतिनिधी)
अखेरच्या क्षणी विकासकामे
नगरपालिकेत सत्तास्थानी असलेल्या मनसेने सुरूवातीच्या चार वर्षात कामाचा वेग कमी ठेवला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. मात्र, अखेरच्या वर्षात सत्ताधाऱ्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कामे करून पक्षाने जनमानसात आपले स्थान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचा उपयोग प्रत्यक्ष निवडणुकीत किती मिळतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मनसेने सत्तापदाच्या काळात केलेली ही कामे मतदानाच्या रूपाने पेटीत पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.