तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी घातले १ लाख सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:54 AM2019-02-23T11:54:21+5:302019-02-23T11:55:32+5:30
सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण केला.
रत्नागिरी : सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण केला.
जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. गतवर्षी या उपक्रमात ४ हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून १ लाख ३४ हजार सूर्यनमस्कार घातले होते. त्यामुळे यंदा यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोसायटीतर्फे करण्यात आला होता.
रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पहाटे ५.३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली. यामध्ये पालकांचाही समावेश होता. यावेळी सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, बापू गवाणकर, विश्वनाथ बापट, रमा जोग यांच्यासह शाळांचे शिक्षक, पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडून तालबद्ध सूर्यनमस्कार घालून घेण्यात येत होते. या उपक्रमात जी. जी. पी. एस्., शिर्के हायस्कूल, जांभेकर विद्यालय, केळ्ये हायस्कूल, अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, लॉ कॉलेज, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, देसाई हायस्कूल, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृहमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी शिल्पा पटवर्धन यांनी बोलताना सांगितले की, उत्तम जीवन जगण्यासाठी मनाचे आरोग्य, बुद्धीचे आरोग्य आणि देहाचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार हा तीन आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. सूर्यनमस्काराने माणसाचा रजोगुण कमी होतो. विद्यार्थ्यांसह देशाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य किशोर सुखटणकर म्हणाले की, विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी सूर्यनमस्कार महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून, सूर्यनमस्काराचा संकल्प दरवर्षी राबवण्यात यावा, असे सांगितले.