अमली पदार्थ विक्रेत्यांची रत्नागिरी पोलिसांनी उतरवली 'झिंग'; सुमारे ४ कोटींचा साठा जप्त

By अरुण आडिवरेकर | Published: December 6, 2023 05:16 PM2023-12-06T17:16:20+5:302023-12-06T17:17:33+5:30

२५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

around 4 crore worth of drugs seized in eight months In Ratnagiri district | अमली पदार्थ विक्रेत्यांची रत्नागिरी पोलिसांनी उतरवली 'झिंग'; सुमारे ४ कोटींचा साठा जप्त

अमली पदार्थ विक्रेत्यांची रत्नागिरी पोलिसांनी उतरवली 'झिंग'; सुमारे ४ कोटींचा साठा जप्त

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : अमली पदार्थांच्या विळख्यातून जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी पाेलिसांनी धडक कारवाईची माेहीम हाती घेतली आहे. गेल्या आठ महिन्यांत पाेलिसांनी एकूण ३९ कारवाया केल्या असून, अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या ७४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ३ काेटी ७९ लाख ३५ हजार २१२ रुपयांचा १२८ किलाे ८६९ ग्रॅम इतका अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीचे जाळे माेठ्या प्रमाणात पसरले आहे. अमली पदार्थांचे वाढते जाळे राेखण्याकडे काही अंशी दुर्लक्ष झाले. त्यामुळे या ‘नशेली’ दुनियेत तरुणाई ओढली जाऊ लागली.  जिल्ह्यातील अमली पदार्थाची वाढती विक्री ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांचे हे पसरणारे जाळे राेखण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी धडक माेहीम हाती घेतली आहे.

या माेहिमेंतर्गत फेब्रुवारी ते ऑक्टाेबर (एप्रिल वगळून) या आठ महिन्यांत ३९ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमध्ये गांजाबाबत २७, ब्राऊन हेराॅईनच्या ११, ॲम्फेटामाईन व टर्कीची प्रत्येकी एक तर चरसच्या दाेन कारवायांचा समावेश आहे. या कारवायांमध्ये ६७ जणांकडे अमली पदार्थ सापडला असून, ७ जण सेवन करताना पाेलिसांना सापडले आहेत.

पाेलिसांनी केलेल्या या कारवाईत ३ लाख ४२ हजार ९८२ रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तसेच १९ लाख ९५ हजार ९८० रुपयांचे ब्राऊन हेराॅईन, ३ काेटी ५५ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा चरस, ९ हजार ४५० रुपयांचा टर्की आणि ५५ हजारांचा ॲम्फेटामाईन जप्त करण्यात आला आहे.

गांजा सेवन करणारे १६

पाेलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १६ जण गांजाचे सेवन करताना सापडले आहेत, तर ३५ जणांनी स्वत:कडे गांजा बाळगला हाेता. ब्राउन हेराॅइनजवळ बाळगलेले सात, ॲम्फेंटामाइन व चरस बाळगलेले प्रत्येकी चार तर एकाकडे टर्की हा अमली पदार्थ सापडला.

२५ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव

अमली पदार्थाच्या विक्रीत सहभाग असलेल्या रेकाॅर्डवरील २५ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे गेले आहेत. त्यातील १४ जणांच्या प्रस्तावावर महिनाभरात निर्णय हाेणार आहे, तसेच तुरुंगात असणाऱ्या आराेपींना जामीन हाेऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जामीन मिळाला आणि त्यानंतर त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न हाेतील, असे जिल्हा अधीक्षक कुलकर्णी म्हणाले.

सर्वाधिक कारवाया रत्नागिरीत

जिल्ह्यात १० ठिकाणी अमली पदार्थविराेधी कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कारवाया रत्नागिरी तालुक्यातील करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी शहर हद्दीत १९ आणि ग्रामीण हद्दीत तीन अशा एकूण २२ कारवाया करण्यात आल्या आहेत, तर चिपळूणमध्ये सात, खेडमध्ये तीन, दापाेलीत दाेन आणि लांजा, नाटे, संगमेश्वर, सावर्डे, गुहागर येथे प्रत्येकी एक-एक कारवाई करण्यात आली आहे.

अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी धडक माेहीम हाती घेतली आहे. पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली असून, पडक्या इमारती, समुद्रकिनारे, निर्मनुष्य स्थळांच्या ठिकाणी पाेलिसांचा पहारा आहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगार व ज्यांचा अमली पदार्थ विक्रीत समावेश आहे.  अशांना पाच जिल्ह्यांतून तडीपार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच त्यावर कार्यवाही हाेईल. -धनंजय कुलकर्णी, जिल्हा पाेलिस अधीक्षक.

Web Title: around 4 crore worth of drugs seized in eight months In Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.