लेखापरीक्षकाला लाच घेताना अटक
By admin | Published: August 9, 2016 10:43 PM2016-08-09T22:43:32+5:302016-08-09T23:56:35+5:30
‘लाचलुचपत विभागा’ची कारवाई : सरकारी कर्मचाऱ्यांकडेच मागितली लाच
रत्नागिरी : वार्षिक लेखापरीक्षणातील २० प्रतिकूल मुद्दे कमी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयाच्या कनिष्ठ लेखा परीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. महेंद्र देवीदास नेवे (वय ४०, रत्नागिरी) असे या लाचखोराचे नाव आहे. रत्नागिरी लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई केली. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, नेवे याच्याविरोधातील तक्रार ही सरकारी कर्मचाऱ्यांनी म्हणजेच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग कार्यालयाच्या २०१४-१५ वर्षातील लेखापरीक्षण अहवालात २० प्रतिकूल मुद्दे काढण्यात आले होते. हे मुद्दे कमी करण्यासाठी सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे कनिष्ठ लेखापरीक्षक महेंद्र नेवे यांनी ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीच्यावेळी नेवे यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती २० हजार रुपये लाच मागितली. ही रक्कम नेवे यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयात स्वत: येऊन पंचासमोर हे पैसे स्वीकारले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेवे यांना रंगेहात पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक तळेकर, सोनवणे, सहायक पोलिस फौजदार शिवगण, कदम, जाधवर, पोलिस हवालदार कोळेकर, सुतार, सुपल, ओगले, पोलिस नाईक भागवत, वीर, पोलिस शिपाई हुंबरे व नलावडे यांनी सहभाग घेतला. गेल्या आठ दिवसांत लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. (प्रतिनिधी)