‘ओंकार’च्या व्यवस्थापिका वासंती निकमला अटक
By admin | Published: December 29, 2016 12:03 AM2016-12-29T00:03:23+5:302016-12-29T00:03:23+5:30
अडीच कोटींचा अपहार : सात दिवसांची पोलिस कोठडी
देवरुख : शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत गतवर्षी झालेल्या सुमारे दोन कोटी ५२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापिका वासंती निकम हिला देवरुख पोलिसांनी बुधवारी अटक केली. तिला देवरुख येथील न्यायालयासमोर हजर केले असता तिची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
देवरुख शहरातील ‘अ’ वर्गात असलेल्या ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या अपहारातील प्रमुख आरोपी वासंती निकम यांच्यावर देवरुख पोलिस ठाण्यात २ आॅगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी देवरुख पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू होती. यातील आरोपी निकम हिला बुधवारी अटक करण्यात आली.
ओेंकार पतसंस्थेत दोन कोटी ५५ लाख ७४ हजार २४१ रुपयांचा अपहार झाल्याबाबत व्यवस्थापिका वासंती निकम हिच्या विरोधात पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी यांनी देवरुख न्यायालयात दाद मागितली होती. यानुसार न्यायालयाने देवरुख पोलिसांना तत्काळ सीआरपीसी १५६ (३) अन्वये निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश २८ जुलैला दाखल क रण्यात आलेल्या तक्रारीवरून देण्यात आले होते.
यानुसार देवरुख पोलिस ठाण्यात २ आॅगस्टला वासंती निकम यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६७, ४७१ अन्वये व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे (६६ ड) कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव करीत होते. यावरून ओंकार पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापिका वासंती अनिल निकम हिला तब्बल पाच महिन्यांच्या चौकशीनंतर देवरुख पोलिसांनी अखेर बुधवारी अटक केली. तिला देवरुख न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस. एन. सरडे यांनी तिची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. (प्रतिनिधी)
असा उघडकीस आला अपहार
गतवर्षी फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीस संस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी यांना पतसंस्थेमध्ये आर्थिक अपहार झाला असल्याचा संशय आला. त्यांच्या तक्रारीवरून पतसंस्थेचे व्यवहार व कर्ज यांची तपासणी केली असता, पतसंस्थेतून मोठ्या प्रमाणात ठेवींवर कर्ज प्रकरणे करण्यात आली आहेत, असे दिसून आले.
सुमारे तीन कोटी ४० लाख रुपयांचा हा अपहार असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. ठेवींवरील कर्ज प्रकरणे करण्याचा अधिकार सहकार कायद्यानुसार व्यवस्थापकांना असतो. यामुळे पतसंस्थेच्या व्यवस्थापिका वासंती निकम या प्रथमदर्शनी आरोपी म्हणून दिसून आल्या होत्या.
पासबुकही ताब्यात
शासकीय लेखापरीक्षण करीत असताना १ एप्रिल २०११ ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंतची तपासणी करण्यात आली.
यातून दोन कोटी ५५ लाख ७४ हजार २४१ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
ओंकार अपहरातील मुख्य आरोपी वासंती निकम हिच्याकडून तिच्या नावे असलेली बँकेचे पासबुक, चेकबुक आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे तसेच तिचे पती
अनिल निकम यांचेही बँक पासबुक
ताब्यात घेतली आहेत.
आता वासंती निकम ही पोलिसांच्या ताब्यात असल्याने होणाऱ्या पोलिस चौकशीत ती काय गौप्यस्फोट करणार? याकडे देवरुखवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.