Ratnagiri: राजापुरात गंगामाईचे आगमन, काशी कुंडाच्या गोमुखातुन प्रवाह सुरू -video
By मनोज मुळ्ये | Published: March 27, 2024 01:59 PM2024-03-27T13:59:57+5:302024-03-27T14:01:10+5:30
पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकांना दिलासा देणारा
राजापूर : गतवर्षीचा कमी पडलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात कोकण पाणी टंचाईच्या वणव्यात होरपळत असतानाच फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून, मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे.
सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. अजून अडीच महिने कसे काढायचे, हा प्रश्न कोकणवासीयांसमोर असतानाच राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे रविवार, दि. २४ मार्च रोजी सकाळी आगमन झाले आहे.
मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून, काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे पूर्ण भरली आहेत. पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकांना दिलासा देणारा आहे. आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे. याआधी गंगा अधिक काळ वास्तव्याला राहिली असल्याने भाविकांचा ओघ कमी झाला होता. मात्र यंदा अधिक भाविक येथे येण्याची अपेक्षा आहे.