रत्नागिरीत पावसाचे आगमन, मात्र, गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेने यंदा पाऊस कमी
By शोभना कांबळे | Published: June 26, 2023 06:27 PM2023-06-26T18:27:12+5:302023-06-26T18:39:07+5:30
हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला
रत्नागिरी : पावसाने शनिवार (दि.२४)पासून दमदार सुरूवात केली आहे. मात्र, ठराविक सरी वगळता पाऊस म्हणावा तसा अजुनही सुरू झालेला नाही. पावसाचे अजुनही सातत्य दिसून येत नाही. अधूनमधून विश्रांती सुरू असल्याने अजुनही उकाडा कायम आहे. गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा यंदा पाऊस ५० टक्केच पडला आहे. गेल्या २४ ताासात सर्वाधिक पाऊस मंडणगडमध्ये झाला असून दापोली, चिपळूण, राजापूर येथेही अधिक पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाची सुरूवात झाली आहे. मात्र, ठराविक वेळेलाच पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. जून महिन्यात सलग पडणारा पाऊस यंदा कमी झाला आहे. शनिवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर घेतला होता. रविवारीही पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी काही वेळ पडून थांबत होता. मात्र, मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून त्याखोलाखाल दापोली, राजापूर, चिपळूण येथे पाऊस झाल्याची नोंद आहे.
सोमवारी सकाळीही चिपळूणमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. मात्र, अन्य तालुक्यांमध्ये काही सरी वगळता अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे अजुनही म्हणावा तेवढा पाऊस सुरू झाला नसल्याने उकाडाही होत आहे. गेल्या जून महिन्याच्या निम्म्यापेक्षाही यंदा पाऊस कमी झाला आहे.
हवामान खात्याने मंगळवार, दि. २७ रोजी आॅरेंज अलर्ट जाहीर केला असून त्यापुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आता पुढे काही दिवस पाऊस जोरदार कोसळेल, अशी शक्यता वाटत आहे.